पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ – काका कोयटे, अध्यक्ष
पारनेर : पारनेर तालुक्यातील ८६ पतसंस्थांचा वैधानिक तरलता निधी (एसएलआर) च्या माध्यमातून १४२५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पारनेर तालुक्यातील पतसंस्थांची गुंतवणूक तब्बल ५५३ कोटी रुपयांची आहे. म्हणजे शासननाच्या नियमानुसार संस्थांचा एसएलआर २५ टक्के राखण्याची मर्यादा असते. परंतु पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची तरलता ३८.८० टक्के आहे. याचा अर्थ पारनेर तालुक्यातील पतसंस्था सक्षम असून तालुक्यातील पतसंस्था चळवळही सक्षम व सुदृढ असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पारनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहाय्यक निबंध कार्यालय पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांचे आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती आणि १६ जानेवारी २०२४ पत्रकान्वये सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पतसंस्थांद्वारा अभिप्राय मागविणे बाबतचे चर्चासत्र महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम असून अफवांना बळी पडू नये. जिल्ह्यातील एकूण पतसंस्थांच्या ठेवीपैकी १४.०२ टक्के ठेवी एकट्या पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही.
पारनेर तालुक्यातील सहकार चळवळ सक्षम व सुदृढ असूनही भविष्यातील सहकारी पतसंस्थांचे धोके लक्षात घेत बैठकीत सहकारी पतसंस्थांसाठी खालील महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले.
१) सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सभासदत्व स्वीकारावे.
२) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सभासद असलेल्या सहकारी पतसंस्थेने ठेवींना १० टक्के व कर्ज १४ टक्के व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर देऊ नये.
३) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन विविध विषयांवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावी.
४) वैधानिक गुंतवणूक रोख तरलता प्रमाण प्रणालीतून कर्ज वाटप करावे. तसेच राज्यातील सर्व पतसंस्थांनी SLR (एसएलआर) व CRAR (सीआरएआर) मेंटन करावा.
५) कर्मचारी सेवा नियम लागू करणे.
६) स्थैर्य निधी देणे.
७) सहकारी पतसंस्थांनी थकबाकीदारांवर कलम १०१ चे दावे त्वरित दाखल करावे. सहकार खात्याने जास्तीत जास्त ६० दिवसात दाखल केलेल्या दाव्यांचा निकाल द्यावा.
तसेच मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी आचार संहिता तयार केली आहे. ती आचार संहिता कठोरपणे पाळण्याचा निर्णय घेतला असून सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्थांच्या कार्यप्रणालीत कोणताही फरक राहणार नाही.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके व संचालक प्रशांत गायकवाड यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले तर पारनेर सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, सेनापती बापट पतसंस्था चेअरमन रामदास भोसले, कान्हूर पठार मल्टीस्टेटच्या चेअरमन श्रीमती सुशीला ठुबे, कार्यकारी संचालिका नमिता ठुबे, पारनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष शिवाजी मोरे, वसंतराव चेडे, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे आदींच्या प्रमुख उपस्थिती सह पारनेर तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार दत्ता हांडे यांनी मानले.