देशातील सहकारी पतसंस्था चळवळ अग्रेसर करण्याचा प्रयत्न करणार – काका कोयटे, अध्यक्ष
द्वारका : गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या तिन्ही राज्यात देशातील एकूण सहकारी पतसंस्थांपैकी ७५ टक्के पतसंस्था आहेत. या तिन्ही राज्यातील सहकारी पतसंस्था फेडरेशन एकत्र येऊन देशातील सहकारी पतसंस्थांची चळवळ अग्रेसर करण्याचा प्रयत्न करणार असून केंद्र सरकारने स्वतंत्ररित्या स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचे सहकार मंत्री अमित शहा गुजरात चे सुपुत्र आहे. तसेच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या राज्याचे सुपुत्र आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील सहकारी पतसंस्था जगभरातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित सहकारी पतसंस्था प्रतिनिधींचा राज्यव्यापी मेळावा २४ व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी देवभूमी असलेल्या द्वारका या ठिकाणी गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष घनश्यामभाई अमीन यांच्या अध्यक्षतेखाली व कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.संजय होजमट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सहकारी पतसंस्था चळवळीचा जन्म गुजरात मध्ये बडोदा या शहरात ‘अन्योन्य परस्पर सहाय्यकारी मंडळी’ च्या माध्यमातून कै.विठ्ठल लक्ष्मण कौठेकर यांनी केला. तसेच गुजरात राज्यात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या अमूल व लिज्जत या देशातील प्रसिद्ध सहकारी संस्था कार्यरत आहे. जगातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांपैकी या सहकारी संस्था गणल्या जातात. तसेच गुजराती माणूस स्वतःशी व कामाशी प्रामाणिक असतो. याचा अनुभव मी स्वतः माझ्या संस्थेत घेत आहे. माझ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ९०० कोटी रुपयांच्या पुढे गेलेले आहेत. याचे श्रेय मी माझ्या सोबत काम करणाऱ्या गुजराती माणसांना देऊ इच्छितो. कारण माझ्या संस्थेतील ११ पैकी जितुभाई शहा, अरविंद पटेल, निरव रावलिया हे ३ संचालक गुजराती आहेत.
या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.संजय होजमट आणि गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष घनश्याम भाई अमीन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. महाराष्ट्रीयन माणसाने गुजरात मध्ये जाऊन त्यांच्या मातृभाषेत मार्गदर्शन करणे हे येथील माणसांना अभिमानाचे वाटते. त्यामुळे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी गुजराती भाषेत उपस्थित पतसंस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.या मेळाव्याला गुजरात राज्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.