Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 8 8 0

राज्य फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये – काका कोयटे, अध्यक्ष

कोपरगाव : तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे कर्ज वितरण करणार नसल्याचा ठराव एक मताने करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव आणि कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक विचार मंथन व प्रशिक्षण शिबिर स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगतातून नामदेव ठोंबळ यांनी विविध कर प्रणालीनुसार तालुक्यातील पतसंस्थांनी कामकाज करत असताना सहकार खात्याने घालून दिलेल्या नियमानुसार काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यातील सहकारी पतसंस्थांना कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्था कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच तालुक्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींची ३ महिन्यातून एकदा आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे म्हणाले की, सहकारी पतसंस्था मजबूत असेल, तर पतसंस्था फेडरेशन मजबूत बनते. त्यासाठी राज्य फेडरेशन अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात आढावा बैठका, विचार मंथन शिबीरे आयोजित करून पतसंस्था मजबूत बनवण्याचं काम करत आहे. या साठी राज्य फेडरेशनला अहमदनगर जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कोपरगाव तालुक्यातील ज्या सहकारी पतसंस्था राज्य फेडरेशन व तालुका फेडरेशनच्या सभासद नसेल त्यांना सभासद होण्याचे आवाहन केले.

तर राज्यातील चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण करून अडचणीत येणाऱ्या पतसंस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पतसंस्थांच्या कामकाजात काटेकोरपणा व नियमितता आणून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सहकारी पतसंस्था पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक तालुका फेडरेशन अंतर्गत करण्यात येत आहे. तसेच या मुळे चुकीचे काम करणाऱ्या अपप्रवृत्तींना ही आळा बसणार असल्याचे अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले.

नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा म्हणाले की,अहमदनगर जिल्हा हा पतसंस्था चळवळीला दिशा देणारा जिल्हा असून कोपरगाव तालुका पतसंस्था चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग मानला जातो. कोपरगाव तालुक्याचे नाव राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी देशातच नाही, तर परदेशातही उंचावलेले आहे. कोपरगाव तालुका हा पतसंस्था चळवळीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाईल.
तसेच प्रशिक्षणाप्रसंगी व्याख्याते दत्तात्रय खेमनर यांनी ‘विविध कर प्रणाली’ व सहकार अभ्यासक शाम क्षिरसागर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १६१ व १४४ कलम या विषयी सविस्तर माहिती दिली.

कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचा आर्थिक अहवाल सादर करत तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची थकबाकी राज्य फेडरेशनच्या वसुली अधिकाऱ्यांद्वारा वेगाने वसूल करून तालुक्यातील सहकारी पतसंस्था चळवळ सुदृढ करणार असल्याचे सांगितले. तर प्रास्ताविकात उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी २ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा करून तालुक्यातील ठेवीदारांचा विश्वास संपादन केलेला आहे. ठेवीदारांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावून कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन इतर तालुक्यातील पतसंस्थांना मार्गदर्शक ठरेल अशी कामगिरी करेल.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका फेडरेशन संचालक राजेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ यांनी विशेष परिश्रम घेतले. या आढावा बैठक, विचार मंथन व प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील ६० पतसंस्थांचे २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी मानले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 8 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे