अंशदान न भरण्याचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांचा संयुक्तपणे निर्णय…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
अंशदान न भरण्याचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांचा संयुक्तपणे निर्णय…
सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन पदाधिकारी, जिल्ह्यातील पतसंस्था प्रतिनिधी यांची बिगर कृषी पतसंस्था नियामक मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकाबाबत संयुक्तपणे बैठक पार पडली.
बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी नियामक मंडळाने जारी केलेल्या अंशदान भरण्याबाबतच्या परिपत्रकाबाबतची सविस्तर माहिती दिली. यावर सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन पदाधिकारी व जिल्ह्यातील उपस्थित प्रतिनिधीं सोबत साधक – बाधक चर्चा होऊन अंशदान न भरण्याचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या परवानगी शिवाय महाराष्ट्रातील कोणत्याही पतसंस्थेने अंशदान भरू नये.असा संयुक्तपणे निर्णय घेण्यात आला.
नियामक मंडळाने जारी केलेल्या अंशदानाच्या परिपत्रकाबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने शासनास १ महिन्याच्या आत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. दाखल केलेल्या याचिकेमुळे राज्य फेडरेशन व सातारा जिल्हा फेडरेशन जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना न्याय मिळवून देईल.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक विनोद कुलकर्णी, डॉ. रवींद्र भोसले, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कदम, संचालक दत्तात्रय पवार, शिरीष चिटणीस, व्यंकटराव मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण क्षीरसागर आदींसह जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.