सीआरएआर व एनपीएचे सुधारित निकषांबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनची भूमिका…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सीआरएआर व एनपीएचे सुधारित निकषांबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनची भूमिका…
कोपरगाव : राज्यातील नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना सीआरएआर व एनपीएचे निकष लागू करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतलेला आहे. या बाबत महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांना सीआरएआर म्हणजे काय? हे समजावे. तसेच एनपीएचे सुधारित निकष काय आहेत? हे समजावे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने झूम मीटिंगचे आयोजन केले होते.
नाशिक व कोल्हापूर विभागासाठी आयोजित केलेल्या या मिटिंगमध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी हे सर्व सुधारित निकष उपस्थितांना समजावून सांगितले. त्यावर सर्वांनी सविस्तर चर्चा केली.
या निकषांच्या बाबतीत सहकार खात्याला महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या सूचना सांगण्यासाठी किंवा नव्याने सुधारित निकषांमध्ये केल्या गेलेल्या बदलांबाबत काही हरकती घेऊन त्या सहकार खात्याकडे सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक , कर सल्लागार जवाहर छाबडा यांचे अध्यक्षते खाली समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, नाशिक जिल्हा फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी थोरात, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या सीआरएआर व एनपीए निकषावर असलेल्या सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडे पाठवाव्यात.असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी केले आहे.