सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल – काका कोयटे, अध्यक्ष
श्रीरामपूर : जग बदलत आहे, त्या बरोबर व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणता व्यवसाय करायचा ? याचा विचार, त्या दृष्टीने अभ्यास आत्तापासूनच सुरुवात करायला हवी. तसेच शेतकरी कुटुंबातील मुलांनी ही जे जगात विकते, ते पिकवावे वाड – वडिलांनी जो शेती व्यवसाय केला, त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा बदल करावा. बदल झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व त्या तंत्रज्ञानाच्या आधारे जे व्यवसाय केले जातात, तेच चालतात आणि त्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊन उंच शिखरे ही गाठता येतात.त्या साठी सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.असे उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स मधील कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘उद्योजकता विकास’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मा. मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्या प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मीनाताई जगधने म्हणाल्या की, काका कोयटे यांच्या १ तासाच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले होते. व्यवसायाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असून त्यासाठी मनापासून जिद्दीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कारण कष्टाशिवाय यश मिळत नाही. समाजाचे निरीक्षण करा. गरजा शोधा. सामाजिक क्षेत्रात काम करा. व्यवसाय हा श्वास आणि ध्यास आहे. त्या बाबत वेगवेगळे विचार करा. तुम्ही केलेले सकारात्मक विचार चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्यमी माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करू.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मंगल घोलप यांनी केले. चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. सुहास ए. निंबाळकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते काका कोयटे यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.विजय नागपुरे, डॉ.मारुती केकाने आदींसह कॉमर्स शाखेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा.अर्षद शेख यांनी मानले.