राहाता तालुक्याला पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करण्याची पतसंस्था प्रतिनिधींनी घेतली शपथ
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राहाता तालुक्याला पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करण्याची पतसंस्था प्रतिनिधींनी घेतली शपथ
राहाता : पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी भारतात सर्व प्रथम सहकारी साखर कारखाना स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी या ठिकाणी रोवली. त्या राहाता तालुक्याला सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करणार असल्याची शपथ २० मे २०२४ रोजी राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली.
आमची पतसंस्था हे एक मंदिर आहे. या मंदिरात येणारा ग्राहक हे आमचे दैवत आहे. आम्ही सर्वजण त्यांचे सेवक आहोत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण, हेच आमचे ध्येय आहे. आम्ही सर्वजण पतसंस्था या देवतेच्या रक्षणासाठी भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणार नाही. पारदर्शी व्यवहार करू, पतसंस्थेचे सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवु, पतसंस्थेच्या सर्व कामकाजाची गोपनियता बाळगू. माझ्या पतसंस्थेचे नाव उज्ज्वल होण्यासाठी रात्रं -दिवस सदैव प्रयत्न करीन. अशी शपथ राहाता तालुक्यातील सर्व उपस्थित पतसंस्था प्रतिनिधींनी घेतली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा स्थैर्य निधी संघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक व विचार मंथन शिबीर तालुक्यातील विठ्ठला लॉन्स, चितळी रोड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
राहाता तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सहकारी कायद्याला धरून सहकारी पतसंस्थांचे कामकाज कसे करावे ? या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या आढावा बैठक व विचार मंथन शिबिराचे प्रास्ताविक राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, राहाता तालुक्यातील पतसंस्था सक्षम आहेत. त्यांनी ठेवीदारांचा विश्वास प्राप्त केल्यामुळे ३१ मार्च २०२४ अखेर तब्बल १ हजार कोटी रुपयांच्यावर ठेवी जमा झालेले आहेत. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी, ठेवींना अधिकाधिक सुरक्षा मिळण्यासाठी राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केलेली क्रास प्रणाली व सिबिल रिपोर्ट वापरल्याशिवाय कोणालाही कर्ज देऊ नये. तसेच राज्य फेडरेशन व अक्षर सोल्युशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचाही अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.
या बैठकीला अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंतशेठ लोढा, स्थैर्य निधी सहकारी संघाचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे, पुखराज पिपाडा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राहाता तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष साहेबराव निधाने, संचालक सतीश गंगवाल, डॉ. स्वाधीन गाडेकर, अशोकराव कोते, दिपकराव गांधी, राजकुमार काले आदींसह तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.