मार्कंडेय पतसंस्थेचा असा ही एक आदर्श – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
मार्कंडेय पतसंस्थेचा असा ही एक आदर्श – काका कोयटे, अध्यक्ष
अहमदनगर : मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था पदमशाली समाजातील गोरगरीब व वंचित घटकांसाठी काम करीत आहे. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करून खूप मोठे कार्य समाजासाठी करीत आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या आर्थिक क्षेत्रात वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करून आदर्श निर्माण करत आहेत. पण नगर शहरात ३२ वर्षांपूर्वी विणकर व विडी कामगारांनी श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करुन समाजातील वंचित व सर्व सामान्यांना पत निर्माण करून दिली असून एक आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे काढले.
श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेला १६ डिसेंबर २०२३ रोजी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सदिच्छा भेट दिली असता, त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. तसेच श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या मार्कंडेय अभ्यासिका व ग्रंथालयास ही भेट देत अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी काका कोयटे यांनी सवांद साधला.
संस्थेविषयी माहिती देताना श्री मार्कंडेय पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम म्हणाले की, ३२ वर्षात १९ कोटी रुपयांच्या ठेवी मिळवल्या असून ९ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक, १६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप संस्थेने केले आहे. संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मार्कंडेय अभ्यासिकेत दररोज १५० पेक्षा जास्त मुले सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत अभ्यासासाठी येत असतात. विद्यार्थ्यांसाठी संस्थेने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची देखील व्यवस्था करून दिलेली आहे.
प्रसंगी पदमशाली समाजातील माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम, संस्थेचे संस्थापक बालराज सामल, चेअरमन नारायण कोडम, संचालक विनायक मच्चा, उमेश इराबत्तीन, संजय चिप्पा, दत्तात्रय अंदे, व्यवस्थापक आशिष बोगा आदींसह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.