नागपूर जिल्हा फेडरेशन आयोजित कार्यशाळेत पतसंस्था प्रतिनिधींची उपस्थिती पतसंस्था चळवळीतील ऐतिहासिक विक्रम – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
नागपूर जिल्हा फेडरेशन आयोजित कार्यशाळेत पतसंस्था प्रतिनिधींची उपस्थिती पतसंस्था चळवळीतील ऐतिहासिक विक्रम – काका कोयटे, अध्यक्ष
नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संपन्न झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत तब्बल ७८० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सलग ३ दिवस पार पडलेल्या या कार्यशाळेत उपस्थित सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची संख्या ही राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील एक ऐतिहासिक विक्रम असल्याचे उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
नागपूर जिल्ह्यातील रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत संपन्न झालेल्या ३ दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने स्थिरीकरण व तरलता साहाय्य निधी ही योजना जाहीर केली आहे. परंतु ही योजना जाहीर करत असताना या योजनेत सहभागी होण्याचे निकष व पात्रता जाहीर केली नाही. तसेच या योजनेबाबत सहकार खात्याने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन बरोबर सविस्तर चर्चा करून नंतर अंशदान मागावे.असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
तीन दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘पतसंस्थांचे स्थिरीकरण व तरलता साहाय्य निधी आणि अंशदान’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर संचालक धनंजय तांबेकर यांनी ‘संपत्ती व्यवस्थापन’, प्रसिद्ध व्याख्याते भूषण क्षीरसागर यांनी ‘प्रभावी कर्ज व वसुलीचे तंत्र’ या विषयावर तर वसुली सल्लागार प्रकाश जाधव यांनी ‘कायदेशीर कर्ज वसुली’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे, शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष माजी आमदार अनिल सोले, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे, उपाध्यक्ष मोरेश्वर मंगरूळकर, धरमपेठ महिला मल्टीस्टेट सोसायटी अध्यक्षा सौ नीलिमा बावणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तज्ञ संचालक हरिभाऊ किरपाने, शिव प्रिया सहकारी पतसंस्था संचालक किशोर भागडे, सेवा श्री साई सहकारी पतसंस्था अध्यक्ष मंगेश सातपुते, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक आशिषजी मुकीम आदी मान्यवर व नागपूर जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.