सहकारी पतसंस्थांनी सुरू केलेल्या क्यु.आर कोड मुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती – सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्थांनी सुरू केलेल्या क्यु.आर कोड मुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती – सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी
कोपरगाव : सरकारी व खाजगी बँकांमध्ये क्यु.आर.कोड प्रणालीद्वारा ग्राहक व्यवहार करत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील सहकारी पतसंस्था द्वारा क्यु.आर कोड प्रणाली राबविण्यात येणार असल्याने ही त्यांच्या साठी अभिनंदनीय बाब आहे. सहकारी पतसंस्थांनी सुरू केलेला क्यु.आर.कोड हा अर्थ क्षेत्रात झालेल्या अत्याधुनिक प्रगतीमुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणार असून पतसंस्थांच्या ग्रामीण, शहरी सभासदांना पारदर्शक, जलद व्यवहाराची संधी मिळणार असून विशेषतः ग्रामीण भागात अर्थक्रांती घडणार असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने क्यु.आर.कोड सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, क्यु.आर.कोड हे तंत्रज्ञान आता केवळ बँकांची मक्तेदारी राहिलेली नसून ग्रामीण भागातील पतसंस्था देखील या प्रणालीद्वारा सर्वसामान्य नागरिकाला सेवा देऊ शकणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या सभासदांना कमी वेळात अधिक व्यवहार करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक सभासद ग्राहकांपर्यंत ही सेवा देणार आहोत.
तसेच गेले काही महिने बंद असलेली ही सेवा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून आता सहकारी पतसंस्थांना पुन्हा उपलब्ध झाली आहे. ज्या सहकारी पतसंस्थांना या सेवेचा लाभ ग्राहकांना द्यायचा असेल त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी केले आहे.
प्रमुख पाहुणे सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तर विभागीय प्रांत अधिकारी माणिक अहिरे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा सत्कार समता पतसंस्थेचे संचालक जितुभाई शहा यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पारखे यांनी केले. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, हितचिंतक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.