अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचा ‘विचार मंथन मेळावा’ संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचा ‘विचार मंथन मेळावा’ संपन्न
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी कामकाज करताना दक्षता घेणे अपेक्षित आहे. या बाबत सहकार खात्याकडून देखील अपेक्षा असून पतसंस्थांनी ही कर्जदारांवर कठोर कारवाई करावी. अडी – अडचणीतील पतसंस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी ‘पतसंस्था चालवताना घ्यावयाची दक्षता’ या विषयावर विचार मंथन व आत्मचिंतन बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी स्थैर्य निधी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पार पडली. तसेच जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ‘विचार मंथन मेळावा’ ही संपन्न झाला.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी ‘पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या भक्कम उभे करून सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा सहकारी स्थैर्य निधी संघ संयुक्तपणे प्रयत्न करीत आहे. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला असलेले ऐतिहासिक महत्त्व वाढविणार असून पतसंस्था चळवळ जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील सभासदापर्यंत पोहचविणार आहोत.
सहकारी पतसंस्था अडचणीत येऊ नये या साठी सहकारी पतसंस्थांचे ऑडिटर, कर्मचारी वर्ग, संचालक मंडळ आदींनी सावधगिरी बाळगणे. तसेच पतसंस्थेचे ऑडिट कसे करावे ? , सोने तारण कर्ज वितरण आदी विषयवार चर्चा करण्यात आली. तसेच नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपध्दती बाबत मेळाव्यात उपस्थित सर्व पतसंस्था प्रतिनिधींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यातील पतसंस्थांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २५०० कोटी रूपये इतकी गुंतवणूक असून देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीच्या काळात पतसंस्थांना कोणतीही मदत करीत नाही. नगर जिल्हयाचे विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवींना १ टक्के जादा व्याज दर दिलाच, त्याचबरोबर अडचणीत येत असलेल्या पतसंस्थांना कर्ज रूपाने आर्थिक मदत देखील केली. त्यानंतर कधीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी पतसंस्थांच्या मदतीला धावून आली नाही.
विचार मंथन मेळावा व बैठक राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. व्यासपीठावर मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे व राज्य फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहाय्यक निबंधक हर्षद तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. विचार मंथन मेळाव्याला जिल्ह्यातील पतसंस्था प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विचार मंथन मेळाव्यात पुढील प्रमाणे ठराव संमत करण्यात आले.
१) लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्या उपस्थितीत जिल्हयातील सहकारी पतसंस्थांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अडचणीतील पतसंस्थांना स्थावर मालमत्तेच्या सुरक्षित तारणावर कर्ज द्यायचे नाकारल्यास नगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व गुंतवणूका काढून घेतील व जी बँक अडी-अडचणीत सहकारी पतसंस्थांच्या मागे उभी राहिल, त्या बँकेत जिल्ह्यातील सर्व पतसंस्था गुंतवणूक करतील.
२) अहिल्यानगर जिल्हयातील सहकारी पतसंस्था सिबील व क्रास प्रणाली वापरूनच कर्ज पुरवठा करतील, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसीत केलेली क्रास प्रणाली सर्व पतसंस्था स्विकारतील.
३) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सहकार खात्यातील अधिकाऱ्यां बरोबर बैठका घेऊन सहकारी पतसंस्थांना अडी-अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणार.
४) अहिल्यानगर जिल्हयातील कोणतीही पतसंस्था अंशदान भरणार नाही. आम्हाला ठेव विमा संरक्षण हवे आहे, पण त्यासाठी अंशदान सक्ती करू नये.