‘सहकार सम्राज्ञी’ किताबाने राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
‘सहकार सम्राज्ञी’ किताबाने राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
जुन्नर : महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करून ठसा उमटविणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ‘सहकार सम्राज्ञी स्पर्धा २०२४’ आयोजित करून जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी अध्यक्षा ॲड.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पालघर येथील भाग्यश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन सौ.भाग्यश्री पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ‘सहकार सम्राज्ञी’ चा ताज सहकार उद्यमीच्या अध्यक्षा ॲड.अंजली पाटील यांनी चढवत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस म्हणून रोख स्वरूपात देण्यात आले.
द्वितीय क्रमांक चिखली येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था जनरल मॅनेजर सौ.मनीषा बोंद्रे यांनी पटकावला. तृतीय क्रमांक नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था कर्ज विभाग प्रमुख सौ.ज्योती निकम व अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिपिक सौ.पुनम होले यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ बक्षीस श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी शेअर विभाग प्रमुख सौ.योगिता पटारे यांना कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सौ.कल्पना बांगर यांच्या हस्ते देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळविलेल्या सौ. मनिषा बोंद्रे यांनी सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकाचे हजार रुपये ७ हजार रुपये बक्षीस म्हणून रोख स्वरूपात देण्यात आले.
स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील १८ महिला सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा प्राथमिक स्तरावर ऑनलाईन घेण्यात आली. ऑनलाईन स्पर्धेत निवडल्या गेलेल्या स्पर्धकांना पतसंस्था चळवळ व पतसंस्थांच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्या आधारे २०२४ च्या ‘सहकार सम्राज्ञी’ ची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून क्रांती शितोळे यांनी काम पाहिले. आदर्श महिला पतसंस्था अध्यक्षा व कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सौ.कल्पना बांगर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक भास्कर बांगर, संचालिका भारती मुथा, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष अमित बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरण सोहळ्याचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे यांनी मानले.