दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
संगमनेर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार व पतसंस्था चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दोन दिवसीय पतसंस्था पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांचा सन्मान संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बापुसा टाक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.
‘पतसंस्था कर्ज वसुली आणि संचालकांची जबाबदारी’ या विषयावर राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. तसेच ‘लेखा परीक्षणाचे महत्त्व व लेखा परीक्षणाला सामोरे जाताना…’ या विषयावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, ‘सकारात्मकतेतून पतसंस्था थकबाकी वसुली’ या विषयावर राजेंद्र ढालकरी यांनी मार्गदर्शन केले. बँकिंग तज्ञ प्रशांत खोपटीकर आणि शाम क्षीरसागर यांनी अनुक्रमे ‘एनपीए व्यवस्थापन व नफा वृद्धी’ आणि ‘पतसंस्था दस्तऐवजांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, सहकार भारतीचे संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल रोहम, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष अरुण हिरे, सचिव दत्तात्रय फटांगरे आदींसह प्रशिक्षण शिबिराला संगमनेर तालुक्यातील ३५० च्या वर पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.