तुळजाई पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
तुळजाई पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते संपन्न…
तुळजापूर : तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक आलेख हा उंच झेप घेणारा असून सध्याच्या परिस्थितीत ठेवी, सोनेतारण यामध्ये केलेली वाढ उल्लेखनीय आहे. नवीन वर्षामध्ये संस्थेने टाकलेले आर्थिक प्रगतीचे पाऊल निश्चितच उंच शिखराकडे घेऊन जाणारे आहे. तुळजाई पतसंस्थेने आर्थिक प्रगती बरोबरच सभासदांचा विश्वास देखील कमावला असून संस्थेची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या तुळजाई दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा ०१ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते संस्थेच्या तुळजापूर (खुर्द) येथील मुख्यालयामध्ये संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
संस्थेविषयी अधिक माहिती देताना चेअरमन राजाभाऊ देशमाने म्हणाले की, तुळजाई पतसंस्थेच्या ३१ डिसेंबर २०२३ अखेर २७ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असुन संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ५० लाख रुपयांचे झाले आहे. संस्था २५ हजार रुपयांच्या भाग भांडवलावर चालु केली होती. संस्थेचा स्वनिधी ५ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा असुन संस्थेने सुमारे १६ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेस ३१ डिसेंबर अखेर ५६ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असुन संस्थेने खातेदारांना अल्प व्याजदरामध्ये सोने तारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. सोने तारण कर्जाचा व्याजदर फक्त १०% (८४ पैसे) ऐवढा अल्प ठेवला आहे. तसेच संस्थेच्या लोहारा व तुळजापूर शहरामध्ये सोने तारण कर्जाचे विस्तारीत कक्ष खातेदारांच्या सोईसाठी उपलब्ध आहे.
तसेच तुळजापूर (खुर्द) सारख्या गावामध्ये अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर कार्यरत असलेल्या कु.अंकिता अंकुश पवार यांचा तुळजाई सांस्कृतिक व क्रिडा मंडळ व तुळजाई पतसंस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काका कोयटे यांचा सन्मान संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास पुणे येथील विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन सुनिलशेठ रुकारी, कळंब येथील राजाभाऊ मुंडे, लातुरचे उदयोजक उदय लोढा, लक्ष्मण उळेकर, गुरुनाथ बडुरे, बसवेश्वर कॉलेजचे निवृत्त प्राचार्य गिरजाप्पा मुचाटे, संस्थेचे संचालक पंडितराव जगदाळे, आदिनाथ ठेले, रमेश भोजने, रामहरी भोजने, संजय देशमाने, प्रा.निलेश एकदंते, मकसुद शेख संस्थचे सर्व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार व्यवस्थापक संजय ढवळे यांनी केले.