पाणीपुरी विकणे हे केवळ यूपीचे भैय्याच नाही , तर महाराष्ट्रातील महिलाही करू शकतात…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
पाणीपुरी विकणे हे केवळ यूपीचे भैय्याच नाही , तर महाराष्ट्रातील महिलाही करू शकतात…
पुणे : येथील अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था महिलांना पाणीपुरी स्टॉल उभारून देत असून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. महिलांना स्वयं रोजगार निर्माण व्हावा. या उद्देशाने अर्थसिध्दी नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन, महिलांना एकत्रित करून अर्थसिध्दी जागृती महिला मंचची स्थापना केली आहे.
या मंचाच्या वतीने विविध स्ट्रीट फूड बाबत मार्गदर्शन, वित्त पुरवठा व विक्रीसाठी एकत्रित प्रयत्न करणे अशा प्रकारचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येत आहे.असे अनोखे मॉडेल तयार केले आहे. यात ज्या महिला उद्योग करतील त्यांना उत्पन्न मिळणार आहे. या साठी बचत गटातील महिलांना ८० हजार रुपये कर्ज देऊन १ लाख रुपयाचा पाणीपुरी स्टॉल उभा करून देण्याची कल्पना चेअरमन भगवानराव कोठावळे यांची आहे. पुण्यात किमान १०० स्टॉल उभारण्याची तयारी केली आहे.
पाणीपुरी विकणे हा केवळ उत्तर प्रदेशातील भैय्यांचा व्यवसाय नाही तर महाराष्ट्रीयन महिला देखील हा व्यवसाय उत्तमपणे करू शकतात, कुटुंबाला हातभार लावू शकतात. हा व्यवसाय केवळ सायंकाळी तीन ते चार तासांचा आहे.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम अर्थसिद्धीच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष काका कोयटे आणि सहकार उद्यमीच्या अध्यक्षा ॲड.अंजलीताई पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
५ डिसेंबर २०२३ रोजी मंचाच्या वतीने सौ.उज्वला विश्वनाथ बसावे यांच्या पहिल्या पाणीपुरी फूड स्टॉलचे उदघाटन दि विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, अर्थसिध्दी पतसंस्थेचेअध्यक्ष भगवान कोठावळे, उपाध्यक्ष श्रीकांत तोडकर, सचिव रवींद्र साळुंखे आणि कै.भिकूबाई मेनकुदळे (पंचम) लिंगायत ट्रस्टचे कार्यवाह स्वप्नील खडके उपस्थित होते.