राज्यातील पतसंस्थांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण संगणक प्रणाली सुविधेचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राज्यातील पतसंस्थांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण संगणक प्रणाली सुविधेचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकारी पतसंस्थांना प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन प्रशिक्षण संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून त्या ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयात २९ एप्रिल २०२४ रोजी सहकार आयुक्त श्री.शैलेश कोतमिरे यांच्या हस्ते व अप्पर आयुक्त व निबंधक कृष्णा वाडेकर, उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षणातून आर्थिक प्रगती सहकारी पतसंस्था साधत असतात.राज्य फेडरेशनने आयोजित केलेली प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळांना प्रशिक्षण केंद्रात येऊन प्रशिक्षण घ्यावे लागते किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्हीही खर्च होतो. अशा प्रकारची तक्रार महाराष्ट्रातील अनेक पतसंस्थांची होती.
यावर विचार विनिमय करून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व अक्षर सोल्युशन या संस्थेचे संस्थापक अद्वैत माडगूळकर यांनी संयुक्तपणे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक पतसंस्थेचा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी स्वतःच्या संस्थेतून अथवा घरी असताना देखील घेऊ शकतो. त्यामुळे वेळ व पैसा या दोन्हींची बचत होणार आहे.
महाराष्ट्रातील या ऑनलाईन संगणक प्रणालीचा राज्यातील अधिकाधिक सहकारी पतसंस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सहकार आयुक्त श्री शैलेश कोतमिरे व राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष श्री. ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले आहे. या वेळी राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा, खजिनदार दादाराव तुपकर, संचालक चंद्रकांत वंजारी, सुरेश पाटील, रवींद्र भोसले, सुदर्शन भालेराव, सौ.भारती मुथा, जवाहर छाबडा, वासुदेव काळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे आदी पदाधिकारी, संचालक , बँकिंग तज्ञ उपस्थित होते. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कार्यालयाशी संपर्क साधावा.