राज्यातील पतसंस्थांना मल्टिपल लोनमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करू – मिलिंद काळे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राज्यातील पतसंस्थांना मल्टिपल लोनमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करू – मिलिंद काळे, अध्यक्ष
हैद्राबाद : महाराष्ट्रातील सहकारी बँका व पतसंस्था यांना संयुक्तपणे काही उपक्रम राबवता येतील. विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान सहकारी पतसंस्था चळवळीत अधिकाधिक यावे, यासाठी कॉसमॉस बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेण्यात येतील. कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील तज्ञ सहकारी पतसंस्थांना मार्गदर्शन करतील. बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून मल्टिपल लोन करून यात राज्यातील सहकारी पतसंस्थांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करू. असे प्रतिपादन कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई च्या वतीने देण्यात येणारा दिपस्तंभ पुरस्कार २०२३ – २४ चा पुरस्कार वितरण सोहळा ०४ ऑगस्ट २०२४ रोजी हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे कॉसमॉस सहकारी बँक अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या शुभ हस्ते व गोदावरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी अध्यक्षा सौ.राजश्री पाटील, विश्वेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल रुकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आर्थिक वर्षामध्ये राज्यातील सहकारी पतसंस्थांनी केलेल्या आर्थिक प्रगतीत पारदर्शक व्यवहार, वाढते भाग भांडवल, विविध योजना व उपक्रम, वसुली पॅटर्न, सामाजिक क्षेत्रात योगदान या बाबींमुळे पतसंस्थांना मिळालेला हा पुरस्कार पुढील आर्थिक वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणा देणार आहे. तसेच गत वर्षात केलेल्या उत्कृष्ट आर्थिक प्रगतीची शाब्बासकी देखील आहे.
राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोकण या विभागातील ०१ ते १० कोटी रुपये, १० ते ५० कोटी रुपये, ५० ते१०० कोटी रुपये व १०० कोटी पुढील ठेवी अशा प्रकारे ४ गट पाडून ७३ सहकारी पतसंस्थांना दिपस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यातील गौरविण्यात आलेल्या या सहकारी पतसंस्थांसह पगारदार, मल्टीस्टेट व महिला पतसंस्थांचाही समावेश होता.
या वेळी राज्यातील विविध पतसंस्थांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थांचे विविध विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सुत्रसंचालन उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी मानले.