पतसंस्था चळवळीला योग्य नेतृत्व मिळाले – बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
पतसंस्था चळवळीला योग्य नेतृत्व मिळाले – बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री
संगमनेर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ देशाला नाही, तर जगाला परिचित करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम काका कोयटे करत आहे. त्यांनी वेळोवेळी चुकीचे काम करणाऱ्या पतसंस्थांची कान उघडणी करून, योग्य समजही दिली आहे. तसेच सहकारी पतसंस्थांच्या विरोधात अन्यायकारक परिपत्रके, पतसंस्थांचे विविध प्रश्न या बाबत सहकार खात्याकडे अर्ज, विनंत्या वेळ प्रसंगी मोर्चे,आंदोलने करून सोडविली आहेत. त्यामुळे पतसंस्था चळवळीला काका कोयटेंच्या रूपाने योग्य नेतृत्व मिळाले असून लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने त्यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळेल.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मान.बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा २ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मान. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व श्री खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी विधान परिषद सदस्य सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, काका कोयटे नेतृत्व करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ९०० कोटी रुपयांच्या पुढे गेलेल्या आहेत. तसेच समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, योजना उपक्रमांबाबत ही महाराष्ट्रात समता पतसंस्था अग्रेसर आहेत. त्यामुळे समता पतसंस्थेचे व्यवस्थापक, अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झेपावेल.
मनोगत व्यक्त करताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, खांडगाव सारख्या ग्रामीण भागात लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी सहकारी पतसंस्थेने ३० कोटी रुपयांच्या ठेवी मिळविल्या आहेत. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासावर भव्य – दिव्य इमारत उभी करून पतसंस्था चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पतसंस्था चळवळीचा अभिमान आहे.
कार्यक्रमाला ए.डी.सी.सी. बँकेचे व्हा.चेअरमन ॲड. माधवराव कानवडे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ, संचालक इंद्रजीत भालेराव, संगमनेर सहकारी दूध संघाचे रणजितसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह संगमनेर तालुक्यातील सहकारी, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हा.चेअरमन संजय गुंजाळ व उपस्थितांचे आभार व्यवस्थापक खंडेराव वर्पे यांनी मानले.