सहकार खात्याची ठेव संरक्षण योजना अव्यवहार्य – उदय जोशी, राष्ट्रीय महामंत्री
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकार खात्याची ठेव संरक्षण योजना अव्यवहार्य – उदय जोशी, राष्ट्रीय महामंत्री
अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने जाहीर केलेली ठेव संरक्षण योजना अव्यवहार्य असल्याने सहकारी पतसंस्थांनी या योजनेत सहभाग घेऊ नये. सहकार खात्याने या योजनेचा विविध पैलूंच्या माध्यमातून अभ्यास करून यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत. तो पर्यंत या योजनेला स्थगिती द्यावी. असे मत सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित रायगड जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचा मेळावा सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ॲड.जे.टी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यात जिल्हा फेडरेशन कार्यरत आहेत. त्यापैकी २८ जिल्हा फेडरेशनने एक मताने ठराव करून ते ठराव राज्य फेडरेशनकडे पाठवलेले आहेत. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहकार भारती व जिल्हा फेडरेशनला विश्वासात घेतल्याशिवाय या योजनेची अंमलबजावणी करू नये – ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अध्यक्ष
प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी चित्रफिती द्वारा या योजनेतील त्रुटी बाबतचे सविस्तर सादरीकरण करताना म्हणाले की, या योजनेत प्राथमिक भाग भांडवल महाराष्ट्र शासनाने टाकणे आवश्यक आहे. या योजनेचे नाव ठेव विमा संरक्षण महामंडळ असे असावे. तसेच या योजनेला आय.आर.डी.ए.ची मान्यता घेण्यात यावी. या योजनेचे व्यवस्थापन सहकार, बँकिंग व पतसंस्था चळवळीतील तज्ञांकडे द्यावे. ही योजना स्विकारताना आरबीआयने नेमलेल्या जगदीश कपूर समितीचा अहवाल विचारात घ्यावा.
ठेव संरक्षण योजना जाहीर करताना महाराष्ट्र शासन व सहकार खात्याने अतिशय घाई केलेली आहे. ठेवींना संरक्षण मिळणार असल्याचे गाजर दाखवले आहे. ही योजना सहकारी पतसंस्थांना लाभदायक नसून, अतिशय दोषपूर्ण आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी ही योजना स्वीकारू नये.असे आवाहन रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड.जे. टी.पाटील यांनी केले.
या मेळाव्याला राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष दिलीप जोशी, संचालक दिलीप पटेल, हेमंत पाटील जगदीश कवळे, चंद्रकांत घोसाळकर, नरेन जाधव, उषा चांदगावकर, कविता ठाकूर, रमेश नाईक, प्रमोद पाटील, सिताराम कवळे आदींसह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रायगड जिल्हा फेडरेशनचे सचिव योगेश मगर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष दिलीप जोशी यांनी मानले.