सहकारी पतसंस्थांनी आर्थिक दृष्ट्या होत असलेले विविध बदल स्वीकारावे – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्थांनी आर्थिक दृष्ट्या होत असलेले विविध बदल स्वीकारावे – काका कोयटे, अध्यक्ष
श्रीरामपुर : अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठेव सुरक्षितता , कर्जाविषयीची विविध कलमे व नवनवीन बदल, संस्थेतील अंतर्गत व्यवस्थापन याबाबत राज्य, विभागीय प्रशिक्षण शिबिरे, वर्ग आयोजित करून राज्यातील सहकारी पतसंस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम व सभासदांचा विश्वास संपन्न पतसंस्था बनविण्याचा प्रयत्न राज्य फेडरेशन नेहमीच करत आलेले आहेत. फेडरेशनच्या या विविध उपक्रमांमुळे श्रीरामपूर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सुदृढ असून तालुक्यातील पतसंस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी त्यांनी होत असलेले विविध बदल स्विकारावे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
सहकाराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अहमनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सहकारी पतसंस्थांचे ‘संचालक व अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण वर्ग’ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध विषयाच्या अनुषंगाने अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल उपस्थित सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा अंबिका महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक अण्णासाहेब जाधव, यशवंत पतसंस्थेचे व्यवस्थापक माधव निंबाळकर, जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक राहुल दायमा यांनी संयुक्तपणे सत्कार करून आभार मानले.
श्रीरामपूर तालुक्यातील अंबिका महिला पतसंस्था, यशवंत पतसंस्था, जनसेवा पतसंस्था व सुदर्शन पतसंस्थेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी आदींसह तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाचे सुत्रसंचालन व नियोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लवांडे यांनी केले होते.