महाबळेश्वर येथील परिसंवादात ‘मार्गदर्शन व मनोरंजन’ असा दुहेरी संवाद…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
महाबळेश्वर येथील परिसंवादात ‘मार्गदर्शन व मनोरंजन’ असा दुहेरी संवाद…
महाबळेश्वर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांनी ठेव, कर्ज, नफा, व्यवसाय व संस्थेचे मार्केटिंग, ब्रॅण्डिंग या बाबतीत झेप घ्यायची असेल, तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुढाकार घेऊन नेहमीच मार्गदर्शन करत आली आहे. राज्यातील अधिकाधिक सहकारी पतसंस्थांनी सहभागी होऊन स्वतःच्या संस्थेचा आर्थिक विकास साधावा. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयाटे यांनी केले.
महाबळेश्वर येथील ‘क्लाऊड मिस्ट’ या ठिकाणी ‘झेप पतसंस्थांची : हिच ती सुवर्णसंधी’ या विषयाच्या अनुषंगाने दोन दिवसीय परिसंवाद राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. १३ जिल्ह्यातील १०० च्यावर पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक पतसंस्था भक्कम स्थितीत उभ्या असून बदलत्या काळानुसार अनेक पतसंस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला संस्थेच्या विकासाच्या आराखड्याची जोड हवी असते. ती जोड या परिसंवादाच्या माध्यमातून उपस्थित प्रतिनिधींना मिळणार आहे.
परिसंवादात बँकिंग तज्ञ गणेश निमकर यांनी ‘व्यवसाय वाढ व नफा वृद्धी’, नंदकुमार पापडकर यांनी ‘ वाढ’, अभिजीत पाटील यांनी ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच सहकार खात्यात अप्पर निबंधक या पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यक्षम, अभ्यासू, प्रामाणिक अधिकारी डॉ.संजय भोसले यांनीही या परिसंवादाला सपत्नीक उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्यात्यांसह डॉ.संजय भोसले यांचा सपत्नी कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सायंकाळच्या महाबळेश्वर येथील थंडीत कॅम्प फायर मध्ये नेटवीन सॉफ्टवेअर प्रा.लि.चे मसऊद अत्तार यांनी मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी सुरेल स्वरात गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. उपस्थितांपैकी देखील काहींनी मराठी, हिंदी गाणी म्हणण्याचा आनंद लुटला. काहींनी विनोदी चुटकुले सांगितले. तसेच उपस्थित प्रतिनिधींमध्ये गोल रिंगण करून, ‘महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व पतसंस्था चळवळी’ विषयी कागदावर प्रश्न लिहून, तो कागद चेंडू स्वरूपात तयार करून, संगीताच्या तालावर एकमेकांकडे फेकण्यात येत होता. ज्या वेळेस गाणे बंद होईल, त्या वेळेस ज्याच्याकडे तो चेंडू असेल. त्या प्रतिनिधीने त्या प्रश्नाचे उत्तर देणे. अशी अनोख्या स्वरूपाची प्रश्न – उत्तरांची स्पर्धा घेऊन, बरोबर उत्तरे दिलेल्या प्रतिनिधींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.अशा प्रकारे महाबळेश्वर येथील परिसंवाद हा ‘मार्गदर्शन व मनोरंजन’ असा दुहेरी संवाद राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून साधला गेला. या परिसंवादाचे सुत्रसंचालन व उपस्थित प्रतिनिधींचे आभार राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी मानले.