मावळ तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
मावळ तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष
लोणावळा : सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी, विविध प्रश्न, मागण्या पतसंस्थांच्या मजबूत संघटनातून पूर्ण होत असतात. त्यामुळे मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी, मागण्या सोडविण्यासाठी मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी सहकारी पतसंस्थांचे तालुका फेडरेशन स्थापन करून सहकारी पतसंस्थांचे मजबूत संघटन करण्याचा निर्णय मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या बैठकीत एक मताने घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
लोणावळा येथील भगवान श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ‘मावळ तालुक्यातील पतसंस्थांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र २९ मे २०२४ रोजी अग्रसेन पतसंस्थेच्या अग्रसेन महाराज सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अंशदान हा देखील पतसंस्था चळवळी समोरील जाचक प्रश्न असून त्या विरोधातही राज्य पतसंस्था फेडरेशन योग्य तो निर्णय घेत आहे. तसेच भगवान श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था आधुनिकतेकडे वाटचाल करीत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा संस्थेचा लेखा – जोखा चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला. ही कौतुकास्पद बाब असून मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांसाठी दिशादर्शक आहे.
राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी फेडरेशनचे कामकाज आणि काका कोयटे यांच्या नेतृत्व व कर्तृत्व या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडविले. तसेच अक्षर सोल्यूशनचे अद्वैत माडगूळकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन राबवित असलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण पोर्टल विषयीची सविस्तर माहिती दिली असता तालुक्यातील २१ पतसंस्थांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली.
राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची राज्यातील पतसंस्था चळवळीविषयीची तळमळ पाहून त्यांच्याविषयी असणारा आदर द्विगुणीत झाला असून मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आर्थिक वाटचाल करणार असल्याचे भगवान श्री अग्रसेन पतसंस्थेचे अध्यक्ष राजीव अग्रवाल यांनी सांगितले.
या वेळी मावळ तालुक्यातील २१ पतसंस्थांचे चेअरमन, सरव्यवस्थापकांसह अग्रसेन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ.सुनिता अग्रवाल, सचिव संतोष अग्रवाल, संचालक सौ. मधु अग्रवाल, रियाज मनियार, गोविंद खंडेलवाल, सौ.निलम गुप्ता आदींसह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्यवस्थापकीय अधिकारी सौ.राजश्री कानडे यांनी मानले.