शेगाव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
शेगाव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न…
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे २८ व २९ रोजी दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे जेष्ठ संचालक व प्रशिक्षण समिती प्रमुख डॉ. रविंद्र भोसले यांच्या हस्ते राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, संचालक राजुदास जाधव वासुदेव काळे सुदर्शन भालेराव आणि महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यातील २६० प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी मार्गदर्शनपर मनोगतातून ‘महाराष्ट्रातील पतसंस्थांची सद्य:स्थिती व फेडरेशनची भूमिका’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बँकिंग तज्ञ संजय देशपांडे यांनी ‘एनपीए व्यवस्थापन व शाखा व्यवस्थापन’ , प्रकाश जाधव यांनी ‘वसुली तंत्र व मंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ‘नेटविन सॉफ्टवेअर सोल्युशन व पिओसीट सॉफ्टवेअर’ या तंत्रज्ञानाची माहिती शिबिरार्थींना देण्यात आली. सी.आर.ए.आर, सी.आर.आर, एस.एल.आर, फंड मॅनेजमेंट याबाबत जनसेवा सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर शिरीष पोळेकर यांनी सविस्तर माहिती दिली. समीर कानसे यांनीही पतसंस्थांमधील तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित प्रतिनिधींचे राज्य फेडरेशनचे संचालक राजुदास जाधव व सुदर्शन भालेराव यांनी शंका – समाधान केले.
समारोप प्रसंगी मेहकर येथील सत्यजित अर्बन संस्थेचे चेअरमन शामभाऊ उमाळकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करत मराठवाड्यातील अधिकाधिक पतसंस्थांनी फेडरेशनचे सभासद होण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत सुदर्शन भालेराव यांनी केले. प्रशिक्षण शिबिराचे सुत्रसंचालन राजुदास जाधव यांनी केले. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शेगाव अर्बन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण अरबट यांचे अनमोल सहकार्य लाभले. उपस्थितांचे आभार राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांनी मानले.