सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा- आ. खोतकर ; सहकार दिंडीचे जालन्यात स्वागत; भव्य शोभायात्रेत सहकाराच्या महाकुंभाची अनुभूती
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा- आ. खोतकर ; सहकार दिंडीचे जालन्यात स्वागत; भव्य शोभायात्रेत सहकाराच्या महाकुंभाची अनुभूती
जालना : सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहे. शेतकरी, लघुउद्योग, महिला, तरुण आणि गरीब वर्गासाठी ही चळवळ मोठा आधार ठरली आहे. सहकार चळवळीमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली असून, सहकारी पतसंस्था, बँका, दूध संघ, कृषी प्रक्रिया उद्योग आणि विविध सहकारी संस्थांमुळे जनतेला रोजगार आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. सहकारी पतसंस्था आणि बँकांपुढे अनेक अडचणी असतानाही त्या तग धरून आहेत. अशा परिस्थितीत ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलताना केले.
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले असून, त्यानिमित्त 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या जनजागृतीसह सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी 1 फेब्रुवारी रोजी रात्री महेश भवन येथे मुक्कामी आल्यानंतर स्वागताध्यक्ष आ. अर्जुनराव खोतकर यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगर विभागीय सहनिबंधक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे, पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर, सहकार दिंडी प्रमुख सुदर्शन भालेराव, सहकार भारतीचे अध्यक्ष सचिन वाणी, उपाध्यक्ष प्रसन्ना जाफराबादकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पवार, संचालक राजाभाऊ देशमुख, प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक तथा माजी आमदार ॲड. विलासराव खरात, अध्यक्ष भूषण भक्कड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश टोपे, जालना पिपल्स बँकेचे संचालक सतीश पंच, अशोक पांगारकर, विष्णू पाचफुले, पंडितराव भुतेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आ. खोतकर पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या या मंडळीच्या मनात समाजाप्रती वेगळा भाव पाहायला मिळतो. जनतेचे कल्याण व्हावे, हा त्यांचा उद्देश आहे. ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करणारे सहकार हे क्षेत्र आहे. देणारे हात म्हणून सहकाराकडे पाहिले जाते. अर्थपुरवठा करते तेव्हा ही मंडळी हवीहवीशी वाटते. मात्र, वसुलीसाठी जातात तेव्हा ही मंडळी नकोशी वाटू लागते. जनतेने वेळेवर कर्ज परतफेड केली तरच सहकार चळवळ मजबूत बनेल. या क्षेत्राच्या अनेक अडचणी आहेत. तुमच्या अडचणी आपापल्या जिल्ह्याचे खासदार, आमदारांकडे लेखी स्वरूपात दिल्यास त्यावर सभागृहात आवाज उठविता येईल. त्यातील मीदेखील एक असेल, असे सांगून समजून घेणारे व उपाययोजना करणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून राज्याला लाभले आहेत. त्यांच्या पातळीवरील समस्या ते निश्चितच सोडवीतील, असे आ. खोतकर म्हणाले.
विभागीय सहनिबंधक शरद जरे म्हणाले की, श्रीमंत आणि गरीब अशी दोघांमधील दरी कमी करण्याची ताकद सहकार चळवळीत आहे. ॲड. विलासराव खरात यांनी बदलत्या परिस्थितीनुसार सहकारी संस्थांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे म्हणाले की, सहकार दिंडीमुळे सहकार क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत १६ देशांचे प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील १० हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या परिषदेला अर्ध्यावर मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पवार यांनी केले.
रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पतसंस्था फेडरेशन, सहकार भारतीचे पदाधिकारी व सदस्यांसह माजी आमदार राजेश टोपे, भास्करराव दानवे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, राजेश राऊत, राजाभाऊ देशमुख, बाजार समितीचे संचालक अनिल सोनी, समर्थ बँकेचे सरव्यवस्थापक विजय कनुजे, आदींची उपस्थिती होती. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून आ. खोतकर यांनी शोभायात्रेचा शुभारंभ केला. या शोभायात्रेत सहकार क्षेत्रातील २५ चित्ररथ होते. ठिकठिकाणी शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. स्वागत कमानी, रांगोळ्या आणि जय सहकारच्या जयघोषामुळे परिसर दुमदुमून गेला. सर्वात समोरील राज्य पतसंस्था फेडरेशनच्या चित्ररथावर सहकार चळवळीवर आधारित पथनाट्य आणि वारकरी भजनी मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावर अनेक ठिकाणी चहा, पाणी आणि नाश्त्याची सेवा पुरविण्यात आली. ही शोभायात्रा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बडी सडक, सदर बाजार पोलीस स्टेशन, मामा चौक, महावीर चौक, मुथा बिल्डिंग, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर, कचेरी रोडने जाऊन मुक्तेश्वर लॉन्स येथे समारोप झाला. त्यानंतर सहकार दिंडी पुढील प्रवासासाठी छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ झाली.
शोभायात्रेत जालना जिल्ह्यातील ४० बँका, सहकारी पतसंस्था आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी हजारोच्या संख्येने सहभागी झाल्याने सहकाराचा महाकुंभ दिसून आला.