Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

नाशिकमध्ये अभूतपूर्व जल्लोषात सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत ; पुण्य भूमीत जमली पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांची मांदियाळी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 7 1 8 5

नाशिकमध्ये अभूतपूर्व जल्लोषात सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत ; पुण्य भूमीत जमली पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांची मांदियाळी

नाशिक : पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नाशिक शहरात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे मोठ्या उत्साहात “न भूतो न भविष्यती” असे अभूतपूर्व स्वागत झाले. फुलांची उधळण करीत तुतारीच्या निनादात ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या दिंडीला पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दिंडीने समस्त नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते.

नाशिक शहरात ठिकठिकाणी फटाके वाजवून या सहकार दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. विविध पतसंस्थांच्या महिला संचालक व कर्मचारी पारंपरिक मराठमोळ्या वेशात आकर्षक फेटे बांधून दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दिंडीत महिलांनी फुगडी खेळून आनंद लुटला. विविध पतसंस्थांच्या वतीने दिंडीतील राज्य पतसंस्था फेडरेशनच्या आकर्षक चित्ररथातील पालखीवर फुलांची उधळण करीत सहकारमहर्षि, भारतीय संविधान, सहकार विषयक ग्रंथांचे पूजन करण्यात आले. “जय सहकार”, ” अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा”, “विना सहकार नही उद्धार”, “पतसंस्था चळवळीचा विजय असो” अशा घोषणांनी नाशिक नगरी दणाणून गेली होती. दिंडीतील कलापथकाने पतसंस्थांचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे‌ यांच्या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सहकाराचा जागर करीत निघालेल्या या दिंडीला ठिकठिकाणी उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद मिळत असून, नाशिकमध्येही त्याची प्रचिती आली. बुधवारी (५ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता शहरातील गडकरी चौकात या दिंडीचे आगमन झाले.

या ठिकाणी नाशिकचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संभाजीराव निकम, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, नाशिक तालुका उपनिबंधक संदीप जाधव, सहाय्यक निबंधक राजेंद्र ईप्पर, मनीषा खैरनार (नाशिक), संजय गिते (सिन्नर), के. डी. गायकवाड (निफाड), राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष नारायणराव वाजे, अंजलीताई पाटील, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, संचालक सुनील केदार, राकेश चव्हाण, अशोकराव व्यवहारे, गजानन महाराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अविनाश कोठावदे, अशोक नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे युवा आघाडीचे नचिकेत पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले व दिंडीच्या स्वागतार्थ काढलेल्या शोभायात्रेचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. ही विराट अशी शोभायात्रा गडकरी चौकातून पिनॅकल मॉल, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबाद नाका, पेठ फाटा, पंचवटी येथे पोहोचल्यानंतर शोभा यात्रेचा समारोप झाला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आवाहनानुसार यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या पुढाकाराने राज्यात विविध उपक्रमांचे नियोजन फेडरेशनने केले आहे. त्याअंतर्गत येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ते शिर्डीपर्यंत ही सहकार दिंडी काढण्यात आली असून या दिंडीला नाशिक शहर व जिल्ह्यातील पतसंस्थांनी ज्याप्रमाणे भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून शिर्डी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नारायणराव वाजे व अंजलीताई पाटील यांनी यावेळी केले.

विभागीय सहनिबंधक संभाजीराव निकम, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, तालुका उपनिबंधक संदीप जाधव, सहाय्यक निबंधक संजय गिते व सहकार विभागाचे अधिकारी व पतसंस्था चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी ही दिंडी आपल्या खांद्यावरून मिरवली. ढोल-ताशांच्या तालावर त्यांनी ठेकाही धरला. दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. भव्य स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या.

दिंडीमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक राजेश सानप, श्रीमती परदेशी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे सतीश नीळकंठ, नेटविन सिस्टिम्स सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष मसूद अत्तार, अजित मेनन, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ ढगे विजय अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राकेश चव्हाण नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र लोखंडे, कल्याणी पतसंस्थेच्या संचालिका डॉ. ज्योती सोनवणे, निमा विसपुते, ॲड. मीरा बोडके, निर्मला कोठारी, प्रतिभा महाले, सीईओ सतीश पुरोहित, अवधूत स्वामी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. अरुण आवटे, उपाध्यक्ष धोंडूअप्पा हिंगमिरे, सचिव पंकज वाणी, जनसंपर्क संचालक गणेश भोरे, व्यवस्थापक कैलास खैरे, ललित म्हमाणे, गोगाबाबा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश आटवणे, उपाध्यक्षा रूपाली कोठुळे, सचिव विजय चौगुले, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय बुरकुल, मोहाडी आदिवासी क्रेडिट सोसायटीचे सचिव संजय जगताप, दिंडोरी आदिवासी सोसायटीचे सचिव योगेश संधान, प्रकाश दिघे, भाबड यांच्यासह नाशिक जिल्हा सहकारी बँक, सुवर्ण नागरी पतसंस्था, कल्याणी नागरी पतसंस्था, अशोक नागरी पतसंस्था, धनलक्ष्मी पतसंस्था व इतर विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 7 1 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे