आळे फाटा येथे सहकार दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; बँड, ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

आळे फाटा येथे सहकार दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; बँड, ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
आळे फाटा, (जि. पुणे) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आयोजित सहकार महर्षी स्व. डॉ.धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे आळे फाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे मंगळवारी (४ फेब्रुवारी) मोठ्या जल्लोषात व उत्साहाने स्वागत करण्यात आले.
फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल – ताशांचा गजर, डीजे व बँडचा निनाद व “जय सहकार”, ” अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा”, “विना सहकार नही उद्धार” अशा गगन भेदी घोषणा देत सहकार पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या पुढाकाराने शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करण्यासाठी, पतसंस्था चळवळीला प्रतिष्ठा मिळवून देत जनतेचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या परिषदेच्या अनुषंगाने सहकाराचे जनक स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने मुंबई ते शिर्डीपर्यंत सहकार दिंडी आयोजित केली आहे. सोमवारी दुपारी ही दिंडी पुण्यातून सायंकाळी चाकण व रात्री नारायणगाव येथे आली.
मंगळवारी सकाळी पिंपळवंडी गावात यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आकर्षक रांगोळ्या काढून व फुलांची उधळण करीत या दिंडीचे उत्स्फूर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे, यशवंत पतसंस्थेचे संचालक फकीरभाई इनामदार, रमेश कोकाटे, प्रकाश तोतरे, भरत शिंदे, संचालिका ज्योत्स्नाताई लेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनाताई मंडलिक, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पिंपळवंडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथराव लेंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कोंडीभाऊ खोंड, श्रीपाद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक पांडुरंग तोतरे, सोपानराव लेंडे, चंद्रकांत वाघ, संजय भुजबळ,साधनाताई चोरडिया आदींनी सहकार दिंडीतील पालखीचे पूजन करून दिंडीत सहभाग नोंदवला.
सहकार क्षेत्रातील आर्थिक सल्लागार लक्ष्मण मंडलिक यांनी दिंडीचे सुंदर नियोजन केले. नंतर ही दिंडी आळे फाटा येथे पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी, बँड व डीजेच्या निनादात सहकाराचा जयघोष करीत जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन व तालुक्यातील विविध पतसंस्थांच्या वतीने दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाजतगाजत ही दिंडी प्रमुख रस्त्यावरून जात असताना ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून पालखीचे मनोभावे पूजन केले. मिरवणुकीत हातात सहकार ध्वज व डोक्यावर आकर्षक फेटे बांधून महिलांसह पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सहसचिव भास्कर बांगर, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, सहकार विभागाचे अधिकारी संतोष भुजबळ, वसंतराव काकडे पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे आदर्श महिला पतसंस्थेचे अध्यक्ष कल्पना भास्कर बांगर, वसंतराव नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष नेताजीदादा डोके, उपाध्यक्ष राजेंद्र चौगुले, स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास वाळुंज, बायजाबाई महिला पतसंस्थेचे अध्यक्ष पुष्पाताई कोरडे, अप्पासाहेब वाव्हळ, संजय गुंजाळ, पीरसाई पतसंस्थेचे अध्यक्ष एकनाथ बेल्हेकर, उपाध्यक्ष मुरलीधर घाडगे यांच्यासह वसंतराव नाईक नागरी पतसंस्था, वडगाव (आनंद), आदर्श महिला पतसंस्था, यशश्री नागरी पतसंस्था, ज्ञानराज पतसंस्था, कुमार ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, शरदचंद्र नागरी पतसंस्था, आळेफाटा आदी विविध पतसंस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सहकार चळवळीवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीत कलापथकातील कलावंतांनी सहकार चळवळ व पतसंस्थांचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केला तर आळंदीच्या संत तुकाराम महाराज शिक्षण संस्थेतील पथकाच्या उत्कृष्ट भजन सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
मिरवणुकीच्या समारोप प्रसंगी भास्कर बांगर, महादेव वाघ, संतोष भुजबळ, लक्ष्मण मंडलिक व सहकार चळवळीतील मान्यवरांची भाषणे झाली. शिर्डी येथे आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय सहकार परिषद पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पतसंस्थांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच परदेशातील पतसंस्था चळवळीची माहिती जाणून घेण्यासाठी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. नंतर ही दिंडी सिन्नरकडे मार्गस्थ झाली.