महाड नगरीत सहकार दिंडीचे जंगी स्वागत ; शोभा यात्रेला प्रचंड प्रतिसाद
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

महाड नगरीत सहकार दिंडीचे जंगी स्वागत ; शोभा यात्रेला प्रचंड प्रतिसाद
महाड : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून मुंबई ते शिर्डीपर्यंत काढण्यात आलेल्या स्व. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी क्र.१ चे ऐतिहासिक महाड (जि. रायगड) नगरीत शुक्रवारी (३१ जानेवारी) अभूतपूर्व जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. दिंडीच्या स्वागतार्थ मोठ्या उत्साहात काढलेल्या भव्य शोभायात्रेत महाड व पोलादपूर तालुक्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक व क्रांतिकारी भूमीत सहकाराचा जागर करीत निघालेली ही दिंडी व शोभायात्रा चर्चेचा विषय ठरली. मराठमोळ्या पारंपरिक वेशात दिंडीत हिरिरीने सहभागी झालेल्या महिलांनी दिंडीतील पालखीचे मनोभावे पूजन करून स्वतः खांद्यावरून पालखी वाहिली. दिंडीत सहभागी महिलांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकाराने येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकारी पतसंस्था चळवळीविषयी जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या या सहकार दिंडीचे शुक्रवारी सायंकाळी अलिबाग येथून महाड येथे आगमन झाल्यानंतर दिंडीच्या स्वागतासाठी सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ऐतिहासिक चवदार तळे परिसरातील तांबट अळी येथील अण्णासाहेब सावंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यालयापासून वाजतगाजत भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली. जय सहकार, अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा, एक दोन तीन चार, सहकाराचा जयजयकार, सहकारातून समृद्धीकडे अशा विविध गगनभेदी घोषणांनी संपूर्ण महाड नगरी दुमदुमली होती. महाडचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) तुषार लाटणे, शिवाई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, उपाध्यक्ष अॅड. विनोद देशमुख, संचालक अॅड. संतोष काळे, व्यवस्थापक राजाराम पाटील, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय जोगळेकर, एकवीरा पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन आर्ते, नितीन पाटील नायक मराठा समाज पतसंस्थेचे अध्यक्ष उतेकर मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष कुमारभाई मेहता, महाड तालुका शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत सारदळ, ‘महाड अर्बन’चे शेलार, सुधीर महाडिक, अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या अध्यक्ष शोभाताई सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा कुद्रीमोती आदींनी या दिंडीचे स्वागत करून शोभायात्रेत सहभाग नोंदविला.
दिंडीमध्ये शिवाई पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था, एकवीरा पतसंस्था, मराठा नायक पतसंस्था, शिवसमर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, श्री सरस्वती महिला पतसंस्था, ब्राह्मण हितवर्धिनी नागरी पतसंस्था, विन्हेरे विभाग ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, वीरवाडी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, महाड क्रांती प्रतीक नागरी पतपेढी, सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्था, महाड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, रायगड जिल्हा गृहनिर्माण संस्थांचा महासंघ, आदर्श प्राथमिक शिक्षक पतसंस्था यांच्यासह महाड व पोलादपूर तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शोभा यात्रेदरम्यान पुण्यातील ‘संस्कृती महाराष्ट्राची’ या कलापथकातील कलावंतांनी दिंडी चालली सहकाराची व सहकारी पतसंस्थांची महती सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य सादर केले तर आळंदी येथील संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील पथकाने टाळ-मृदंगाच्या गजरात उत्कृष्ट भजन सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कलापथक व भजनी मंडळाच्या सादरीकरणास नागरिकांनी भरभरून दाद दिली. महाड शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघालेली ही सहकाराची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर ही दिंडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचली. तेथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सहकार मेळाव्यात सहाय्यक निबंधक तुषार लाटणे, डॉ. अजय जोगळेकर,अॅड. विनोद देशमुख, नेटवीन सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष मसूद अत्तार आदींनी सहकारी चळवळ व सहकारी पतसंस्थांचे महत्त्व विशद करून शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शिवाई नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजाराम पाटील तर सूत्रसंचालन रायगड जिल्हा हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे गंगाधर साळवी यांनी केले. एकवीरा पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन आर्ते यांनी आभार मानले.