Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकार दिंडीचे राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात जोरदार स्वागत

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 3 8 1 2

सहकार दिंडीचे राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात जोरदार स्वागत

मुंबई : दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. दिंडी आणि सहकार यांचे अतूट नाते आहे. सहकार चळवळ ही एकतेचे प्रतीक असून ती सशक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे‌ यांच्या पुढाकाराने शिर्डी येथे होणारी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद देशातील सहकार चळवळीला नवी दिशा देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले.

संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) यंदाचे २०२५ हे वर्ष जगभर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचे स्वागत करत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने‌ यंदा विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेडरेशनतर्फे येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या अनुषंगाने सहकाराचे जनक स्व. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने काढण्यात आलेल्या सहकार दिंडी क्रमांक १ चा शुभारंभ गुरुवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विद्याधर अनास्कर यांच्या शुभहस्ते व काकासाहेब कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ही दिंडी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर तेथे विद्याधर अनास्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने जल्लोषात स्वागत केले.

यावेळी बँकेच्या स्व.धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्याधर अनास्कर यांनी काकासाहेब कोयटे, वसंतराव शिंदे, गोरख चव्हाण, लक्ष्मण पाटील यांच्यासह सहकार दिंडीत सहभागी झालेल्या मान्यवरांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेसाठी राज्य सहकारी बँकेतर्फे दहा लाखांचा धनादेश विद्याधर अनास्कर यांनी काकासाहेब कोयटे यांना सुपुर्द केला.

या वेळी विद्याधर अनास्कर म्हणाले, शेतकऱ्यांना सावकाराच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी सहकार चळवळीची सुरुवात झाली. महाराष्ट्रात स्व.वैकुंठभाई मेहता, स्व.धनंजयराव गाडगीळ, स्व.डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारख्या समाज धुरीणांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे खूप मोठे योगदान आहे. सहकार हा केवळ आर्थिक प्रगतीसाठी नसून सामाजिक न्याय, बंधुता व सर्वसमावेशक विकासासाठी एक प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ जगात सर्वात मोठी चळवळ असून, काकासाहेब कोयटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. पतसंस्था चळवळ अधिक बलवान बनविण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. या वयातही ते ज्या जिद्दीने व उत्साहाने काम करीत आहेत ते इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे.

सरकारच्या जाचक निर्बंधामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या असून, सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्ती बाजूला सारून सहकार चळवळीचे शुद्धीकरण करून ही चळवळ बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काकासाहेब कोयटे यांनी पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे पतसंस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून त्यांच्या पुढाकारातून शिर्डी येथे होणारी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद ही मैलाचा दगड ठरणार आहे. या परिषदेनिमित्त पतसंस्था फेडरेशनने काढलेली सहकार दिंडी जनतेच्या मनात पतसंस्थेविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या वेळी काकासाहेब कोयटे‌ यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेविषयी माहिती दिली. सहकारी पतसंस्थांबाबत जनतेत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, सहकारी संस्थांची प्रतिष्ठा वाढावी, पतसंस्था चळवळीत तरुणांचा व महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने सहकार दिंडी व सहकार परिषदेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार दिंडीचे अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. शिर्डीत आयोजित आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेच्या पूर्वतयारीसाठी मी गेल्या महिनाभरात १८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. त्यामुळे आलेला थकवा आज विद्याधर अनास्कर यांनी अत्यंत आपुलकीने केलेल्या सत्कारामुळे नाहीसा झाला आहे. विद्याधर अनास्कर हे सहकारातील पांडुरंग आहेत. त्यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असून, पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी शिवकृपा सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण, लक्ष्मण पाटील, राज्य सहकारी बँकेचे अधिकारी अनंत भुईभार, बाळासाहेब वर्पे, संजय पोळ यांच्यासह राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे संचालक, राज्य सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार चळवळीच्या बळकटीकरण व सर्वांगीण विकासासाठी सहकाराच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून काम करण्याची शपथ विद्याधर अनास्कर यांनी उपस्थितांना दिली.सुत्रसंचालन डॉ.तेजल कोरडे यांनी केले तर राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने यांनी आभार मानले.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 3 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे