कराडमध्ये सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत; पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांनी केला सहकाराचा जयघोष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

कराडमध्ये सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत; पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांनी केला सहकाराचा जयघोष
कराड : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अभिनव संकल्पनेतून मुंबई ते शिर्डीपर्यंत काढण्यात आलेल्या स्व. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी क्र.१ चे ‘सहकाराची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कराड (जि. सातारा) नगरीत प्रचंड जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. जय सहकार, जय जय सहकार, अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा, सहकारातून समृद्धीकडे, एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ अशा विविध गगनभेदी घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण कराड नगरी सहकारमय बनली होती.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकाराने येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सहकाराचे जनक स्व. वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूर ते शिर्डी व ज्येष्ठ अर्थतज्ञ स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने मुंबई ते शिर्डी अशी सहकार दिंडी काढण्यात आली आहे.
मुंबईहून निघालेली सहकार दिंडी ठाणे, अलिबाग, महाड मार्गे आज शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड येथे पोहोचली. कराड शहरातील दत्त चौकातील शिवतीर्थ पार्क येथे या सहकार दिंडीचे आगमन होताच कराड शहर व तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी व सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक डॉ. रवींद्र भोसले, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका ऋतुजा पाटील, पुण्यशीला मोरे, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) अर्चना थोरात, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक संपतराव शिंदे, कृष्णा-कोयना पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अरुण पाटील, मलकापूर अर्बन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पिसाळ, नेटविन सॉफ्टवेअर कंपनीचे मसुद अत्तार आदींच्या हस्ते दिंडीतील रथाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नंतर शिवतीर्थापासून ही दिंडी सहकाराचा जागर करीत वाजत गाजत आझाद चौक, रविवार पेठ, गुरुवार पेठ, विठ्ठल चौक, मंगळवार पेठ मार्गे प्रीतीसंगम घाटावर गेली. त्या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळीचे बिजारोपण करून सहकारी संस्थांचे जाळे विणले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर या दिंडीत सहभागी झालेल्या सर्वच मान्यवर व विविध पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहकाराचा जयघोष करीत यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
मंगळवार पेठ येथे पी. डी. पाटील साहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील यांनी सहकार दिंडीचे स्वागत करून रथाचे मनोभावे पूजन केले व दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजन वेळापुरे उपाध्यक्ष अनिल सोनवणे संचालक मुनीर बागवान,अशोक कुमार चव्हाण, जयाराणी जाधव, शरदचंद्र देसाई, व्यवस्थापक विवेक वेळापुरे, किशोर जाधव तसेच जनकल्याण नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके यांनी दिंडीचे जल्लोषात स्वागत केले.
हातात सहकाराचा झेंडा घेऊन व गळ्यात सहकाराचे प्रतीक असलेले मफलर घालून सहकारी पतसंस्थांचे असंख्य पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून सहकार रथाचे श्रद्धापूर्वक पूजन केले. कला पथकाने चला पतसंस्थेला जाऊया, दिंडी चालली सहकाराची यासारख्या सहकार चळवळीचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य सादर केले. भजनी मंडळाच्या विविध भजनांनी वातावरण भक्तीमय बनले होते.
या दिंडीमध्ये हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष विनायक पावसकर, आनंदराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मोरणा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष संजय हिरवे, उपाध्यक्ष खाशाबा पवार, मर्चंट सिंडिकेट सोसायटीचे सरव्यवस्थापक विवेक गुंजाळकर, श्रीराम नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक लहू माने, ब्रह्मदास ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील, जन सहकार पतसंस्थेचे अध्यक्ष मारुती मोळावडे, प्रसाद नलावडे, नवरत्न ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभांगी मोळावडे, उपाध्यक्ष मोहम्मद हनीफ सत्तार यांच्यासह कराड तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.