राहाता येथे सहकार दिंडीचे जंगी स्वागत ; फटाक्यांची आतिषबाजी , ढोल – ताशा, डीजेच्या निनादात “जय सहकार” चा घुमला नारा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राहाता येथे सहकार दिंडीचे जंगी स्वागत ; फटाक्यांची आतिषबाजी , ढोल – ताशा, डीजेच्या निनादात “जय सहकार” चा घुमला नारा
राहाता : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेनिमित्त फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सहकारमहर्षि स्व.डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी क्र.१ आणि स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी क्र.२ चे राहाता येथे गुरुवारी विविध सहकारी पतसंस्था व सहकार विभागाच्या वतीने फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल – ताशा, डीजे व बॅण्डच्या निनादात अभूतपूर्व जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी जंगी मिरवणूक काढण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिंडीतील पालखीचे पूजन करून सहकाराचा जयघोष केला. या दिंडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सहकारमहर्षि स्व.डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी क्र.१ ही ३० जानेवारीला मुंबईतील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास अभिवादन करून मुंबईतील विविध उपनगरे, ठाणे, अलिबाग, महाड, कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, चाकण, नारायणगाव, आळे फाटा, सिन्नर, नाशिक, अकोले, संगमनेर तर स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी क्र.२ ही नागपूरहून २९ जानेवारीला सुरू होऊन वर्धा, यवतमाळ, रिसोड, चिखली, मेहकर, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, गेवराई, माजलगाव धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर येथून गुरुवारी (६ फेब्रुवारी) दुपारी प्रवरानगर (लोणी) येथे दाखल झाली. या दोन्ही सहकार दिंड्यांना सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळाला.
दिंडीच्या स्वागतासाठी राहाता शहरात ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल – ताशा, डीजे व बॅण्डच्या निनादात “जय सहकार”, “अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा” ,”विना सहकार नाही उद्धार”, “सहकारी पतसंस्था चळवळीचा विजय असो” अशा विविध घोषणा देत निघालेल्या भव्य शोभा यात्रेत घोडे आणि उंटावर स्वार झालेले तरुण, आकर्षक फेटे बांधलेले पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते, मराठ मोळ्या पारंपरिक वेशातील महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कला पथक व भजनी मंडळाचे सुंदर सादरीकरण या दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना परिसरातील त्यांच्या स्मृती स्थळावर या दोन्ही दिंड्यांचा संगम झाला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. सिंधुताई विखे पाटील व अर्थतज्ज्ञ स्व. डॉ.धनंजयराव गाडगीळ यांना अभिवादन केल्यानंतर सायंकाळी या दोन्ही दिंड्या राहाता शहरात पोहोचल्या.
या दिंडीत सहभागी झालेले राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महासचिव शशिकांत राजोबा, कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे व इतर मान्यवरांचे राहाता तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, राहाता तालुक्याचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) रावसाहेब खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष साहेबराव निधाने, स्वामी समर्थ महिला नागरी पतसंस्थेचे संस्थापक कैलासबापू सदाफळ, डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, संचालक मच्छिंद्र निधाने, साई अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल, गुरूदेव पतसंस्थेचे अध्यक्ष पुखराज पिपाडा, शिवाजी कपाळे, साई माऊली महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुमन वाबळे, अलका अंत्रे, श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पवार, सहकार अधिकारी संजय पाटील, भूषण जाधव, मुख्य लिपीक संदीप कोठूळे, सहाय्यक सहकार अधिकारी एम. एच. शेख, गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक व्यंकटेश आहिरे, मुन्नाभाई शाह, धन्वंतरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. मंगला गाडेकर, उपाध्यक्षा छाया मिसाळ आदी विविध पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष खुशालचंद रायसोनी व इतर संचालक, कर्मचारी, अजय जगताप, महेंद्र कुंकूलोळ, राजकुमार काले, जया तुरकणे, अण्णासाहेब काटकर, अर्जुन तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, चंद्रप्रभा गुरावे, व्यंकटेश सहकारी नागरी पतसंस्था संस्थेचे संचालक सुरेश गाडेकर, वैकुंठवासी साहित्य पुरविणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष दशरथ तुपे, उपाध्यक्ष किरण वाबळे, समता नागरी पतसंस्थेचे राहाता शाखेचे शाखाधिकारी मिलिंद बनकर व कर्मचारी यांच्यासह डॉ. के. वाय.गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था, धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था, स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, नवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, सरस्वती महिला नागरी पतसंस्था आदी पतसंस्थांचे संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडी व शोभा यात्रेमुळे संपूर्ण वातावरण सहकारमय बनले होते. दिंडीतील पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्री शनैश्चर महाराज मंदिर चौकात शोभा यात्रेची सांगता झाल्यानंतर या दोन्ही दिंड्या शिर्डीकडे रवाना झाल्या.