धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचा मुंबईत जल्लोषात शुभारंभ
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचा मुंबईत जल्लोषात शुभारंभ
मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. त्या निमित्ताने आयोजित सहकार महर्षी, जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचा शुभारंभ गुरुवारी (३० जानेवारी) सकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मोठ्या जल्लोषात झाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात सहकाराचा ध्वज उंचावत “जय सहकार”, “अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा” अशा विविध घोषणा देत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सहकारी चळवळीतील वारकऱ्यांचा जणू मेळाच भरल्याचे दिसून आले. सुरवातीला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विद्याधर अनास्कर, काकासाहेब कोयटे, नितीन काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन करत श्रीफळ फोडून दिंडीचा शुभारंभ केला.
दिंडीत सहभागी झालेले भजनी मंडळ, ढोल-ताशा पथक, लोक कला पथक, “जय सहकार, जय जय सहकार” घ्या घोषणा देत हातात सहकाराचा ध्वज व गळ्यात सहकाराचे प्रतीक असलेले मफलर बांधून राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी व सहकार चळवळीतील कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सहकाराचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांनी वातावरण सहकारमय झाले होते.
या वेळी मुंबई जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नितीन काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक शरद जाधव, मुंबईतील शिवकृपा सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदिंसह पतसंस्था फेडरेशन, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी विद्याधर अनास्कर म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ ही जगातील सर्वात मोठी चळवळ असून काकासाहेब कोयटे यांनी राज्यातील पतसंस्थांचे मजबूत संघटन बांधून राज्य पतसंस्था फेडरेशनमार्फत पतसंस्थांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचे कार्य निश्चितच अभिनंदनीय आहे. पतसंस्था चळवळीला आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच पतसंस्थांची प्रतिष्ठा व जनतेत विश्वासार्हता वाढविण्यासाठी काकासाहेबांच्या पुढाकाराने शिर्डीत होणारी सहकार परिषद सहकार चळवळीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (युनो) च्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशने यंदाचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, राज्याचे जलसंपदामंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, ग्लोबल वुमेन्स लिडरशीप नेटवर्क संचालिका एलिनी गायकामापोलस, सहकार आयुक्त डॉ.दीपक तावरे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, खासदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
८ फेब्रुवारीला माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार असून दुसऱ्या दिवशी खुल्या अधिवेशनात मार्गदर्शनपर चर्चासत्र व विविध विषयांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रासह भारतातील सहा राज्यांतील व आठ इतर देशांतील पतसंस्था चळवळीतील १५ हजारांहून अधिक प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार असून यानिमित्ताने शिर्डीत सहकाराचा कुंभमेळाच भरणार आहे. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीला बुधवारपासून नागपूरमधून सुरुवात झाली असून आज मुंबईतून धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी सुरू झाली आहे. या दोन्ही सहकार दिंड्या लोणी (प्रवरानगर) येथे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृती स्थळी पोचल्यानंतर तेथून शिर्डी येथे कार्यक्रमस्थळी रवाना होतील. या दिंडीत व सहकार परिषदेत पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन काका कोयटे यांनी केले.
या वेळी नितीन काळे, वसंतराव शिंदे, गोरख चव्हाण, लक्ष्मण पाटील आदींची भाषणे झाली. कला पथकाने श्री गणेशाला वंदन करत सहकाराचा पांडुरंग, दिंडी चालली, सहकाराची दिंडी चालली व अन्य गाण्यांवर सुंदर नृत्य तर भजनी मंडळाने वीणा, टाळ, मृदंगाच्या निनादात “विठोबा-रखुमाई, ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात सुंदर भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या सहकार दिंडीमध्ये अग्रभागी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा आकर्षक रथ होता. त्यात फुलांनी सजवलेल्या पालखीत सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण वैकुंठभाई मेहता व डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. दिंडीत शिवकृपा पतपेढी, नेटवीन सिस्टीम यांचेही रथ सहभागी झाले आहेत. दिंडीचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दिंडी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पोहोचल्यावर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिंडीचे स्वागत केले. नंतर ही दिंडी मुंबईतील विविध उपनगरातून ठाणे मार्गे अलिबागकडे रवाना झाली.