सुदर्शन पतसंस्थेने संघासारखी शिस्त अंगीकारावी : काका कोयटे, अध्यक्ष ; नवीन जागेत झाला स्थलांतर सोहळा संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सुदर्शन पतसंस्थेने संघासारखी शिस्त अंगीकारावी : काका कोयटे, अध्यक्ष
नवीन जागेत झाला स्थलांतर सोहळा संपन्न
श्रीरामपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांनी संघाची सचोटी व प्रामाणिकपणाचा अंगीकारून पतसंस्थेचा शिस्तबद्ध कारभार करून भविष्यात पतसंस्थेला यशाच्या शिखरावर न्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
श्रीरामपूर येथील सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्थेचे नेवासा रस्त्यावरील भारत गॅसजवळील अनंता सिटी सेंटर या अद्ययावत वास्तुमध्ये पतसंस्थेचे स्थलांतर झाले. या स्थलांतर सोहळ्यात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे अध्यक्षपदावरून बोलत होते.
सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास चव्हाण यांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करताना आर्थिक प्रगतीचा ताळेबंद मांडला. जेष्ठ संचालक शशिकांत कडुस्कर यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, ज्येष्ठ भाजप नेते हेरंब आवटी, पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे संचालक शिवाजीराव कपाळे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे, माधवानंद गिरी महाराज, सुशीलाताई नवले, राजाराम काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पतसंस्थेचे उपाध्यक्ष भूषण साठये यांनी अध्यक्षीय सुचना केली. संचालक किशोर कुलकर्णी यांनी त्यास अनुमोदन दिले.
काका कोयटे पुढे म्हणाले की, संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या या पतसंस्थेचे कामकाज अतिशय शिस्तबद्ध सुरू असून इतर पतसंस्थांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करून ठेवी वाढविताना कर्ज वसुलीसाठी प्रसंगी वाईटपणा घेण्याची तयारी ठेवून पतसंस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केला पाहिजे. तसेच व्यवस्थापिका राखी शर्मा यांनी आवश्यक तेथे संचालक मंडळास योग्य त्या सुचना करून कारभार काटकसरीने करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा प्रकारची सुचनाही काका कोयटे यांनी केली.
संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. बाबा साठये व अनंतराव याडकीकर यांच्या कष्टातून संस्था सुरू झाली आहे. आज २३ वर्षानंतर त्यांची तळमळ फळास आल्याचे समाधान वाटत असून अजूनही बरीच प्रगती करायची आहे पतसंस्था चालविताना पंचसूत्रीचा उपयोग करावा असे ही ते म्हणाले. तसेच माधवानंद गिरी महाराज, शिवाजीराव कपाळे, वासुदेवराव काळे यांनीही पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना “भारत माता” प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ संचालक केशव आवटी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, सुदर्शन पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, व्यापारी, हितचिंतक, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक कर्मचारी एजंट यांनी विशेष परिश्रम घेतले.