Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्था चळवळ सशक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – डॉ. सुजय विखे पाटील ; शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे थाटात उदघाटन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

पतसंस्था चळवळ सशक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – डॉ. सुजय विखे पाटील ; शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे थाटात उदघाटन

शिर्डी : महाराष्ट्राला सहकाराची उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी पतसंस्था चळवळ आहे. राज्यातील पतसंस्था चळवळ मजबूत करण्यात व वाढविण्यात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे खूप मोठे योगदान आहे. ही चळवळ आणखी सशक्त करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवा नेते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उदघाटन शनिवारी (८ फेब्रुवारी) डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते.

पहिल्या दिवशी सहकारी संस्था व पतसंस्था चळवळीत युवक व महिलांचा सहभाग वाढावा या विषयावर परिसंवाद झाला. त्यात महाराष्ट्रासह सहा राज्यातील व आठ देशातील पतसंस्था फेडरेशनच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

या वेळी असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत हेट्टीयाराची (थायलंड), सहकार खात्याचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, निवृत्त अप्पर आयुक्त शैलेश कोथमिरे, सहकार आयुक्तालयातील उपनिबंधक (नागरी पतसंस्था) मिलिंद सोबले‌, फेडरेशन ऑफ ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नेनिता मलबस, नागपी व्हिझेल, सॅलरी बोटेंगन (फिलीपिन्स), पालामुरा यशोदा (श्रीलंका) चंद्रप्रसाद ढकाला, शिवाजी सपकोटा (नेपाळ), जेम्स कॅमाडो, फेरॉन मेरी जेन्नी, ड्रॅक पॅट्रिक केविन (मॉरिशस), सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, कर्नाटकातील श्री बिरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक तथा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आ. शशिकला जोल्ले (चिकोडी, कर्नाटक), “बुलडाणा अर्बन” चे संस्थापक राधेश्याम चांडक, गुजरात पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमीनभाई, कर्नाटक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. होस्पट, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक, विभागीय सहनिबंधक (नाशिक) संभाजीराव निकम, शरद जरे (छत्रपती संभाजीनगर), विभागीय उपनिबंधक बिडवई (नाशिक), जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी (अहिल्यानगर), फैयाज मुलानी (नाशिक), सोपानराव शिंदे, उपनिबंधक संतोष कोरे (संगमनेर), तालुका उपनिबंधक श्रीमती गौंड‌ (अहिल्यानगर), सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ (कोपरगाव), रावसाहेब खेडकर (राहाता), सहकार अधिकारी राजेंद्र रहाणे, संदीप नेरे (कोपरगाव), संजय पाटील (राहाता) यांच्यासह राज्य फेडरेशनच्या सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे‌ यांनी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीवर सर्वसामान्यांचा विश्वास वाढावा यासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी, पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढावी तसेच या चळवळीत युवकांचा व महिलांचा सहभाग वाढावा यासाठी फेडरेशनच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

काका कोयटे म्हणाले, शिर्डी ही श्री साईबाबांची कर्मभूमी आहे. या पावन भूमीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे. विखे पाटील घराणे हे सहकार चळवळीचे जनक आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९२३ मध्ये लोणी (बुद्रुक) येथे पहिली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच १९५० साली प्रवरानगर येथे आशिया खंडातील शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेस आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सहकारी संस्थांमध्ये युवकांना प्राधान्य दिले पाहिजे. डॉ. सुजय विखे पाटील हे भारतात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विखे पाटील घराण्याचे वारसदार आहेत. ते तरुण आहेत. त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक आज त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे उदघाटन केले.

या परिषदेत सहकार खात्याचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, सहकार खात्याचे सल्लागार गणेश निमकर यांनी महाराष्ट्रातील सहकार कायदे, सहकार चळवळीबाबत तर फिलीपिन्स देशातील पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षा नेनीता मॅलबस यांनी त्या देशातील सहकार कायदे, सहकारी पतसंस्था चळवळ याबाबत सादरीकरण करून फिलीपिन्समध्ये पतसंस्था समाजासाठी कशा पद्धतीने काम करतात याची माहिती दिली. रणजीत हेट्टीयाराची म्हणाले, भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पतसंस्थांवर अंशतः नियंत्रण ठेवण्याचे अधिकार तेथील पतसंस्था फेडरेशनला आहेत. त्यामुळे या देशातील पतसंस्था चळवळ मजबूत आहे. अशा प्रकारचे अधिकार महाराष्ट्रात का नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. फेडरेशन मजबूत असेल तर पतसंस्था चळवळ मजबूत होईल. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था फेडरेशन खूप मजबूत आहे. सहकार खात्याने या फेडरेशनला सहकार्य केल्यास महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ जगातील एक नंबरची चळवळ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेत्तीयाराची यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून सहकार खात्याचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर म्हणाले, महाराष्ट्रातील पतसंस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार फेडेशनला दिले पाहिजेत हा मुद्दा बरोबर आहे, परंतु हा कायद्याचा व सहकार मंत्र्यांच्या अख्यत्यारीतील विषय आहे. आम्ही याबाबत शासनाकडे जरूर शिफारस करू.नेटविन कंपनीचे उत्तम गाडगे यांनीही सादरीकरण केले.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी,महासचिव शशिकांत राजोबा, खजिनदार दादाराव तुपकर, उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, चंद्रकांत वंजारी, समन्वयक राजुदास जाधव, सहसचिव शरद जाधव, उपकार्याध्यक्ष नारायण वाजे, अॅड.डॉ. अंजली पाटील, भास्कर बांगर, जवाहर छाबडा, भारती मुथा, संचालक धनंजय तांबेकर, रवींद्र भोसले, सुदर्शन भालेराव, सुभाष आकरे, नीलिमा बावणे, हरिभाऊ किरपाने, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदींनी पाहुण्यांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक समता नागरी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय समन्वयक अॅड.डॉ. अंजली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांनी केले. परिषदेत ग्लोबल वुमेन्स लीडरशिप नेटवर्कच्या संचालिका एलिनी गायकामापोलस, “अॅक्क्यू” च्या मुख्य कार्यकारी अधिकारी एलिनीता सॅन रोक्यू (थायलंड) यांनी ऑनलाइन सहभाग घेत पतसंस्थांची कार्यपद्धती गुणवत्तापूर्ण व पतसंस्था चळवळ सुदृढ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नेनिता मलबस यांनी फिलीपिन्समध्ये पतसंस्था समाजासाठी कशा पद्धतीने काम करतात याची माहिती दिली.

ॲड.डॉ.अंजली पाटील यांनी पतसंस्था चळवळीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सहकार कायद्यात कोणते बदल व्हावेत याविषयी विवेचन केले तर आदर्श क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत पाटील (अलिबाग) यांनी आधुनिक तंत्रज्ञान व युवकांचा सहकारी पतसंस्था चळवळीत सहभाग वाढावा यासाठी काय करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. मुंबईच्या शिवकृपा पतपेढीच्या संचालिका पूनम जगदाळे यांनी शिवकृपा पतपेढीचा ४२ वर्षांचा इतिहास मांडला.

या परिसंवादाचा समारोप करताना काका कोयटे म्हणाले, महाराष्ट्रात १६ हजारांवर सहकारी पतसंस्था असून, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून मोठे नेटवर्क राज्यात उभे राहिले आहे. सहकार खात्याला त्याचा निश्चित फायदा होईल. कर्मचारी अपुरे असतानादेखील पतसंस्था अत्यंत चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर व्हावे तसेच पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास वाढावा यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने राज्य फेडरेशनने काढलेल्या सहकार दिंडीच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबई व नागपूरहून शिर्डीपर्यंत काढलेल्या दोन्ही सहकार दिंड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, यामुळे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार विभाग व पतसंस्था फेडरेशनने हातात हात घालून काम केल्यास महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ जगात पहिल्या क्रमांकाची चळवळ होईल, असेही ते म्हणाले. उद्या ९ फेब्रुवारीला राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथील पिंपळवाडी रोडवरील सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर परिसरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे