Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिर्डीतील सहकार परिषदेत एकजूट दाखवा-काका कोयटे, अध्यक्ष ; साताऱ्यात सहकार दिंडीच्या स्वागतासाठी उसळली तोबा गर्दी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 3 8 1 7

पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिर्डीतील सहकार परिषदेत एकजूट दाखवा-काका कोयटे, अध्यक्ष ; साताऱ्यात सहकार दिंडीच्या स्वागतासाठी उसळली तोबा गर्दी

सातारा : सरकारचा सहकार विभाग व पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केल्यास महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ निश्चितच जगात एक नंबरवर येईल. संघटित शक्तीच्या बळावरच पतसंस्थांचे प्रश्न सुटू शकतील. त्यासाठी सर्व पतसंस्थांची एकजूट महत्त्वाची आहे. शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी राज्यातील पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेनिमित्त सहकाराचे जनक स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मरणार्थ मुंबई ते शिर्डी पर्यंत काढलेल्या सहकार दिंडीचे रविवारी (२ फेब्रुवारी) ऐतिहासिक सातारा नगरीत आगमन झाले. शहरातील पोवई सर्कल येथे या दिंडीचे सहकार विभाग व पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाके वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर “जय सहकार, अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा” अशा विविध घोषणा देत ही दिंडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचली. तेथे आयोजित कार्यक्रमात काका कोयटे बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक डॉ. रवींद्र भोसले, जनता सहकारी बँकेचे संचालक विनोद कुलकर्णी, प्रभारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जे. पी. शिंदे, सहाय्यक निबंधक संजय जाधव आदी उपस्थित होते.

काका कोयटे यांनी शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारीला होणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या आयोजनामागील भूमिका याप्रसंगी स्पष्ट केली. सहकार चळवळीत महिला व युवकांचा सहभाग वाढावा, पतसंस्थांची प्रतिष्ठा व विश्वासार्हता वाढावी, या उद्देशाने ही परिषद आयोजित केल्याचे सांगून ते म्हणाले, या परिषदेत महाराष्ट्रासह सहा राज्यातील व आठ देशातील पतसंस्था चळवळीतील पंधरा हजारावर प्रतिनिधी सहभागी होणार असून, यावेळी महाराष्ट्रातील व परदेशातील सहकार कायदे, सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती व इतर विषयांचे सादरीकरण केले जाणार असून, पतसंस्थांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल. सहकाराची गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत सहकारी बँकांप्रमाणे पतसंस्थांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. अनेक सहकारी पतसंस्था सक्षमपणे चालत असून, “सहकारातून समृद्धी” हे ब्रीद अंगिकारून सहकारी पतसंस्था सर्वसामान्य नागरिकांना अर्थसहाय्य करण्याबरोबर आर्थिक विकासात मोलाचे योगदान देत आहेत.

पतसंस्थांच्या समस्यांबाबत सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. सरकारने पतसंस्थांबाबतचे जाचक कायदे व नियम बदलले पाहिजेत. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यात यावे, अंशदानाबाबत निर्णय घेताना राज्य व जिल्हा पतसंस्था फेडरेशनला सरकारने विश्वासात घ्यावे, पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी क्रास प्रणालीचा वापर अनिवार्य करावा, इतर संस्थांप्रमाणे पतसंस्थांनादेखील सरकारने आर्थिक मदत करावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य पतसंस्था फेडरेशन शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले जात असून या वर्षात शासनाच्या सहकार विभागाशी न भांडता सामोपचाराने पतसंस्थांचे प्रश्न सोडवून घेण्याची भूमिका राज्य पतसंस्था फेडरेशनने स्वीकारली आहे. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते व सहकार विभागाने हातात हात घालून काम केल्यास पतसंस्था चळवळ मजबूत व विकसित होईल, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत वंजारी व डॉ. रवींद्र भोसले यांनी राज्यातील पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन कटिबद्ध असल्याचे सांगून शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस सातारा जिल्ह्यासह राज्यातील पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. विनोद कुलकर्णी म्हणाले, शासनाचा सहकार विभाग पतसंस्थांबाबत दुजाभाव करत असून, सहकार विभागाने पतसंस्थांना जाचक नियम लागू करणे चुकीचे आहे. संस्था चळवळीतील कार्यकर्त्यांना आपल्या प्रश्नांसाठी शासनाबरोबर सतत संघर्ष करावा लागत आहे ही खेदाची बाब आहे. यावेळी प्रभारी जिल्हा उपनिबंधक जे. पी. शिंदे, सहकार अधिकारी प्रमोद चतुर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. रवींद्र भोसले तर सूत्रसंचालन जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण क्षीरसागर यांनी केले. सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे तथा साईशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोरे यांनी आभार मानले.

या वेळी शिवशक्ती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर साबळे, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शाहूराज फाळके, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, अर्जुन देवकुळे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 3 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे