सहकारातील संस्थांनी एकत्र येऊन सहकार बळकट करावा – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सहकारातील संस्थांनी एकत्र येऊन सहकार बळकट करावा – काका कोयटे, अध्यक्ष
पुणे : सहकारातील सर्व संस्थांनी एकत्रित येऊन सहकार बळकट केला पाहिजे. त्यासाठी राज्यातील सहकार हा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी चांगल्या गोष्टीचे मार्केटिंग झाले पाहिजे. सहकारांतर्गत सहकार या तत्त्वाने एकमेकांना एकमेकांच्या कामात योगदान देता आले पाहिजे. तसेच सहकारातील काही अपप्रवृत्तींमुळे सहकाराची होऊ पाहणारी बदनामी थांबवली पाहिजे. याचा देखील विचार विनिमय झाला पाहिजे. यासाठी कायद्यात देखील काही बदल करावे लागतील. यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनाने याबाबत पुढाकार घेऊन समिती तयार करून शासनाला अहवाल सादर करण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ.वि.वि.पाटील सहकार अध्यासन व कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७१ व्या सहकार सप्ताहाचा सांगता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मश्री विखे पाटील सहकार अध्यासन प्रमुख डॉ.अनिल कारंजकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पारितोषिके देण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, पुणे व महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघ अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अध्यक्ष भगवानराव पासलकर, पुणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन अध्यक्ष आनंद यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ कार्यकारी संचालक संजय खताळ, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्थान संचालिका डॉ.हेमा यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, कॉसमॉस सहकारी बँक माजी अध्यक्ष मिलिंद काळे, प्रा.तापकीर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.