राज्य फेडरेशनची थकबाकी वसुलीत उत्कृष्ट कामगिरी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राज्य फेडरेशनची थकबाकी वसुलीत उत्कृष्ट कामगिरी

हिंगोली : संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकबाकी वसुली कामकाजासाठी संस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडे प्रकरण दाखल केले असता, राज्य फेडरेशनचे विशेष वसुली अधिकारी गिरीश ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांकडे थकबाकीदार गुलाब धर्मा राठोड, रामविलास पाचुलाल वर्मा यांच्या मिळकतीचा ताबा देण्यात आला आहे.
चांदा ते बांदापर्यंत राज्यातील कोणतीही पतसंस्था अडचणीत असेल, तर राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे त्यासाठी तळमळीने त्यांना हात देतात, त्यातून मार्ग काढतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यात जाऊन अतिशय उत्तम प्रकारे कामकाज केले व संस्थेला प्रगतीपथाकडे वाटचाल करण्यास मदत केली आहे – सुनील रामप्रसाद सिन्हा, मुख्य व्यवस्थापक, संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था, हिंगोली
वरील कारवाई महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९१ व १०७ अंतर्गत मिळकतीचा ताबा घेऊन करण्यात आली आहे. तसेच सदर कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात थकीत कर्जदाराच्या मिळकतीवर ताबा मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत प्रस्ताव दाखल केला होता.
त्या अनुषंगाने वेळोवेळी पाठपुरावा करत जिल्हाधिकारी यांचा आदेश प्राप्त करून मंडल अधिकारी ए.आर.सय्यद आणि आखाडा बाळापूर शाखा मंडल अधिकारी सरकटे यांनी आदेश बजावणी करून पंचा समक्ष प्रत्यक्षात ताबा राज्य फेडरेशनचे विशेष वसुली अधिकारी गिरीश ताम्हाणे यांनी स्वीकारून संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुनील रामप्रसाद सिन्हा यांच्या ताब्यात देण्यात आला.

या कर्ज प्रकरणात संस्थेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी गुंतलेली होती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे गुलाब धर्मा राठोड, रामनिवास पाचुलाल वर्मा या थकबाकीदारांची १ कोटी ६० लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीचा मार्ग सुकर करून देण्यात राज्य फेडरेशनने महत्त्वाचे कामगिरी बजावली आहेत. त्यामुळे संस्थेच्या थकबाकी वसुलीमुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागणार असून इतर थकबाकी वसुलीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.



