पतसंस्था फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस सहकार विभागाचे सर्वतोपरी सहकार्य – सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे ; पुण्यात पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

पतसंस्था फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस सहकार विभागाचे सर्वतोपरी सहकार्य – सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे ; पुण्यात पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय (मामा) भरणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार रमेशअप्पा थोरात, संचालक रेवणनाथ दारवटकर,रणजीत तावडे,सुरेश घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे यांच्यासह सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सहकार दिंडीचे मनोभावे स्वागत करून रथातील पालखीचे पूजन केले. तसेच काका कोयटे यांचा सत्कार करून आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला शुभेच्छा दिल्या.
पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ जगात सर्वोत्कृष्ट ठरण्याच्या दृष्टीने सहकार विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देणार आणि पतसंस्था फेडरेशन व सहकार खाते हातात हात घालून काम करेल. पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषद यशस्वी करण्यासाठी राज्यातील सहकार खात्याचे सर्व अधिकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी मदत करतील, असे ठोस आश्वासन राज्याचे सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे सोमवारी (३ फेब्रुवारी) पुण्यात आगमन झाल्यानंतर आकर्षक रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी,फटाक्याची आतषबाजी करत घंटानाद, ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. बिबवेवाडी येथील गौड ब्राह्मण समाजाच्या श्री जगदंबा माता मंदिरापासून वाजतगाजत मिरवणुकीने ही दिंडी सहकार आयुक्त कार्यालय येथे पोहोचल्यानंतर सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त अनिल कवडे, अप्पर सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, अप्पर निबंधक राजेश सुरवसे, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, उपनिबंधक मिलिंद सोबले, (नागरी पतसंस्था), आनंद कटके (नागरी बँका), किरण सोनवणे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, संजय राऊत, मिलिंद टांकसाळे, दिगंबर हौसारे, नीलम पिंगळे, सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे, देविदास मिसाळ, हर्षित तावरे, अरुण चाकोरे, श्रीकांत श्रीखंडे, राज्य सहकारी संघाचे एम.एल. सरवदे,एस.एस. बोडके, दिलीप शिंदे आदींनी फटाके वाजवून फुले उधळून दिंडीचे जंगी स्वागत करून सहकार रथाचे पूजन केले. सहकाराची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांनी “जय सहकार” चा जयघोष केला.
सहकाराचा जागर करीत “सहकारातून समृद्धी”चा संदेश देत निघालेल्या या सहकार दिंडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या दिंडीने समस्त पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिंडीत महिलांनी फेर धरत फुगडी खेळली. काका कोयटे व फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. विविध पतसंस्थांच्या वतीने दिंडीच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी भव्य आकर्षक कमानी उभारल्या होत्या. या दिंडीमुळे पुण्यभूमीतील वातावरण सहकारमय बनले होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मिरवणुकीच्या सांगता कार्यक्रमात डॉ. तावरे म्हणाले, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीत पतसंस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सहकार विभाग पतसंस्था चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून ही चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सहकार खात्याचे पतसंस्था फेडरेशनला नेहमीच सहकार्य राहील. बुलढाणा अर्बन, समता,शिवकृपा, ज्ञानदीप यासारख्या अनेक सहकारी पतसंस्थांचे कार्य आदर्शवत आहे. पतसंस्थांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या विविध उपक्रमांचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. जनतेचा पतसंस्थांवर मोठा विश्वास असून तो वृद्धिंगत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांच्या प्रश्नांवरून आमचे सहकार खात्याशी मतभेद आहेत. कधी कधी आम्ही सहकार खात्याशी भांडतो देखील. सहकार खात्याकडे आम्ही आईच्या भूमिकेतून पाहतो. बाळ रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही. म्हणून आम्ही कधी कधी आक्रोश करतो.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आम्ही सहकार खात्याच्या हातात हात घालून काम करून सर्व सहकारी संस्थांसमोर एक नवा आदर्श निर्माण करणार आहोत. पतसंस्थांची प्रतिष्ठा व विश्वासार्हता वाढावी, या उद्देशाने पतसंस्था फेडरेशनतर्फे शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारीला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. सहकार विभागाने पतसंस्थांच्या प्रश्नांवर कायम स्वरूपी तोडगा काढून आम्हाला मोठे गिफ्ट द्यावे, असे सांगून ते म्हणाले, या परिषदेत महाराष्ट्रासह सहा राज्यातील व आठ देशातील पतसंस्था चळवळीतील पंधरा हजारावर प्रतिनिधी सहभागी होणार असून, यावेळी महाराष्ट्रातील व परदेशातील सहकार कायदे, सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती व इतर विषयांचे सादरीकरण व पतसंस्था चळवळीबाबत मंथन केले जाणार आहे.
यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक भारती मुथा,”बुलढाणा अर्बन” चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिलशेठ गाढवे,माजी अध्यक्ष सुनीलशेठ रूकारी, शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण,पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, बँकिंग सल्लागार गणेश निमकर, डॉ. मणीभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक अनिकेत कांचन,धनसिंग पोंदकुले, अर्थसिद्धी पतसंस्थेचे अध्यक्ष भगवान कोठावळे, उपाध्यक्ष श्रीकांत तोडकर, पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, स्त्रीशक्ती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा क्रांती शितोळे, सिध्देश्वर बँकेचे संचालक राजाभाऊ मुंडे, चंद्रशेखर दंदणे, योगीराज पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, जनहित पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश घाटे, विनोद खोले, सिद्धेश्वर पतसंस्थेचे सुधीर राजमाने, शिवकृपा पतपेढीच्या संचालिका मनीषा जगदाळे, पूनम जगदाळे, सहकार भारतीचे प्रकाश पटवर्धन, वसुधा खरे,सुचित्रा दिवाण, बाळ भिंगारकर, अर्थसिद्धी पतसंस्थेचे संचालक सुनील कसबेकर, रवींद्र साळुंखे, सुनील खडके, प्रणिता तोडकर, प्रणोती कोठावळे, शिल्पा कोंढाळकर,जयश्री तोडकर, शुभांगी गायकवाड,जितेंद्र मोटे, उज्वला बसवे, गणेश शेंडगे, अनिल रूद्रके यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी व विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.