“जय सहकार” च्या घोषणांनी दुमदुमले सिन्नर ; सहकार दिंडीचे हर्षोल्हासात स्वागत
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

“जय सहकार” च्या घोषणांनी दुमदुमले सिन्नर ; सहकार दिंडीचे हर्षोल्हासात स्वागत
सिन्नर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेनिमित्त सहकाराचे जनक स्व. डॉ.धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने काढण्यात आलेल्या सहकार दिंडीचे मंगळवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी सिन्नर (जि. नाशिक) येथे आगमन झाले. सिन्नर शहर व तालुक्यातील विविध पतसंस्था तसेच सहकार विभागाच्या वतीने या सहकार दिंडीचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आवाहनानुसार यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जगभर साजरे केले जात असून, यानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या संकल्पनेतून राज्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन फेडरेशनने केले आहे. त्या अंतर्गत शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ते शिर्डीपर्यंत ही सहकार दिंडी काढण्यात आली असून, मंगळवारी सायंकाळी या दिंडीचे सिन्नर येथील संगमनेर नाका येथे आगमन झाल्यानंतर फुलांची उधळण व सहकाराचा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सिन्नर येथे सहकार दिंडीच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी “जय सहकार”, ” अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा”, “विना सहकार नही उद्धार”, “पतसंस्था चळवळीचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. यावेळी टाळ, मृदंग वाजवत “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात सुंदर भजने सादर करणाऱ्या बालवारकऱ्यांनी तसेच राज्य पतसंस्था फेडरेशन, शिवकृपा पतपेढी, नेटविन सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर कंपनीच्या चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. कला पथकाने पतसंस्थांचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य व पथनाट्य सादर केले.
सहाय्यक निबंधक संजय गिते (सिन्नर), सर्जेराव कांदळकर (लोणावळा), राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष नारायणराव वाजे, सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र अंकार, सचिव मच्छिंद्र चिने, सहकार भारतीचे तालुकाध्यक्ष बी. एम. पवार, जिजामाता महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा गारे, “नेटविन” कंपनीचे मसूद अत्तार व अन्य मान्यवरांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे श्रद्धापूर्वक पूजन करून ही दिंडी शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरवण्यात आली. फुलांची उधळण, टाळ – मृदंगाचा गजर व सहकाराचा जागर करीत निघालेल्या पारंपरिक वेश परिधान करून आकर्षक फेटे बांधून महिला मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी सामाजिक, राजकीय, सहकार व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीतील पालखीचे पूजन करून पालखीला खांदा दिला. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

विघ्नहर्ता पतसंस्थेच्या अध्यक्षा नीता कुलकर्णी, पं. दीनदयाळ उपाध्याय पतसंस्थेच्या अध्यक्षा रोहिणी चव्हाण, हेमलता शिंदे, सिद्धेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षा ललिता कोतवाल, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रत्नाकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष निरगुडे, विघ्नहर्ता पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अत्रे, संचित नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा छाया घोलप, उपाध्यक्ष अनिल सरवार, व्यवस्थापक राजू घोलप, थोरले बाजीराव पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुटे, श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुब शेख, संत सावता माळी पतसंस्थेचे व्यवस्थापक नवनाथ राजगुरू यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक, तालुका पतसंस्था फेडरेशन, सहकार भारती तसेच सहकार विभाग व तालुक्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व गट सचिव बहुसंख्येने दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडी बस स्थानक परिसरात पोहोचल्यानंतर तेथे दिंडीला निरोप देण्यात आला. यावेळी नारायणराव वाजे म्हणाले, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था चळवळ मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करण्यासाठी, पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकाराचे जनक स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने मुंबई ते शिर्डी व स्व. वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूर ते शिर्डी अशा दोन सहकार दिंड्यांचे आयोजन केले आहे. या दोन्ही दिंड्यांचा संगम प्रवरानगर (लोणी) येथे होणार असून, सहकारमहर्षि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृती स्थळावर अभिवादन केल्यानंतर त्या ९ फेब्रुवारीला शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सहाय्यक निबंधक संजय गिते, सर्जेराव कांदळकर, राजेंद्र अंकार, बी. एम. पवार यांचीही भाषणे झाली.



