जयसिंगपूरमध्ये आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सहकार रथाचे पूजन ; काकासाहेब कोयटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पतसंस्थांची यशस्वी घोडदौड
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

जयसिंगपूरमध्ये आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सहकार रथाचे पूजन ;
काकासाहेब कोयटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पतसंस्थांची यशस्वी घोडदौड
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईपासून शिर्डीपर्यंत काढण्यात आलेल्या स्व. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे आगमन झाले. ही दिंडी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात पोहोचल्यानंतर आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दिंडीचे जल्लोषात स्वागत करून सहकार रथाचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्यातील पतसंस्थांची यशस्वी घोडदौड सुरू आहे, असे प्रशंसोदगार त्यांनी काढले.
या वेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा,नेटवीन सॉफ्टवेअर कंपनीचे मसूद अत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार भारतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष प्रा. भाऊ बगाटे व राज्य पतसंस्था फेडरेशनचे निमंत्रित संचालक तथा कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे संचालक सागर चौगुले यांच्या हस्ते आ. राजेंद्र पाटील यड्रावकर व अन्य प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या वेळी आ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघाच्या आवाहनानुसार सन २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष केवळ उत्साही कार्यक्रमांचे आयोजन न करता सहकार चळवळीच्या अनुषंगाने चिंतन मनन व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे करण्याचे नियोजन राज्य पतसंस्था फेडरेशनने केले आहे. त्यानुसार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने मुंबई ते शिर्डीपर्यंत तर सहकाराचे जनक स्व. वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूर ते शिर्डीपर्यंत अशा दोन सहकार दिंड्यांचे नियोजन राज्य पतसंस्था फेडरेशनने केले आहे. तसेच शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी मोठी वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ वाढविण्यासाठी फेडरेशनने हाती घेतलेले विविध उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक प्रकाश उपाध्ये, चंद्रकांत द्वासावंत, शाखाधिकारी रावसाहेब चौगुले तसेच अधिकारी, कर्मचारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित सहकार दिंडीच्या स्वागतासाठी जयसिंगपूर शहरातून भव्य दिव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.