Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी – काका कोयटे‌, अध्यक्ष ; राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंड्यांचा‌ प्रवरानगर येथे संगम

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 9 2 8 2

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी – काका कोयटे‌, अध्यक्ष ; राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंड्यांचा‌ प्रवरानगर येथे संगम

लोणी : भारतातील कृषी, औद्योगिक, सहकारी पतसंस्था व साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक सहकारमहर्षि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हे सहकारातील दीपस्तंभ आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आदर्शवत व प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेनिमित्त राज्य पतसंस्था फेडरेशनने आयोजिलेल्या सहकार दिंड्यांचा संगम त्यांच्या स्मृतिस्थळावर झाला. सहकार चळवळीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानास्पद घटना आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण पावन झालो आहोत. पतसंस्था चळवळीत काम करण्यासाठी आम्हाला नवी ऊर्जा मिळाली, अशी भावना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित मुंबई ते शिर्डी स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी क्र. १ व नागपूर ते शिर्डी स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी क्र.२ गुरुवारी (६ फेब्रुवारी) दुपारी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना परिसरातील त्यांच्या स्मृती स्थळावर दाखल झाल्यानंतर दोन्ही दिंड्यांचा संगम झाला. यावेळी काका कोयटे यांनी सहकारमहर्षि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या समाधीवर व अर्थतज्ज्ञ स्व.डॉ.धनंजयराव गाडगीळ यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. दोन्ही दिंड्यांचे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने डीजे बॅण्डच्या‌ निनादात जोरदार स्वागत करण्यात आले.

काका कोयटे पुढे म्हणाले, सहकार हाच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे, याची जाणीव झाल्यानंतर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मूलमंत्र देत १९५० मध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आशिया खंडातील शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला सहकारी साखर कारखाना उभारला आणि सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. लोणी (बु.) येथे पहिली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सुरू केली. त्यानंतर त्यांनी प्रवरा परिसरात अनेक सहकारी संस्था स्थापन करून सहकाराचे जाळे निर्माण केले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे व शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध झाले. त्यांनी सहकार क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी शंभर वर्षांपूर्वी अनेक सहकारी संस्था स्थापन करून या संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनात समृद्धी आणली.

भविष्यात येणाऱ्या आर्थिक मंदीतून जगाला सावरण्यासाठी सहकार हाच पर्याय आहे याची जाणीव शंभर वर्षानंतर झाल्याने संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा वारसा माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी जपत सहकाराला चालना दिली. त्यांच्यानंतर आज राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे त्यांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार चळवळ रूजविण्यात व वाढविण्यात विखे घराण्याचे मोठे योगदान असून, त्यांची चौथी पिढी आज सहकारात यशस्वीपणे कार्यरत आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांना सहकारी संस्थांच्या विशेषतः पतसंस्थांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, ते पतसंस्था चळवळीचे संकटमोचक आहेत. पतसंस्था अडचणीत आल्या तेव्हा त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे. आजही ते पतसंस्था चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहकार्य करतात.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे स्वागताध्यक्षपद त्यांनी स्वीकारल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. विखे पाटील यांनी खाजगीऐवजी सहकारी संस्थांना नेहमीच प्राधान्य दिले असून, सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे हा विचार घेऊन ते काम करतात, असे सांगून शिर्डीत आयोजित सहकार परिषदेत सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन काका कोयटे यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांचीही भाषणे झाली. यावेळी राहाता तालुक्याचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) रावसाहेब खेडकर, कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, राहाता तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, दादासाहेब घोगरे, साहेबराव म्हस्के, किरण दिघे, सुभाष अंत्रे, दत्तात्रय खर्डे, अण्णासाहेब म्हस्के, अशोक घोलप, डॉ. दिनकर गायकवाड, शांताराम जोरी, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, अशोक सिंघवी, शिवाजी कपाळे‌, सांगलीतील वीराचार्य पतसंस्थेचे एन. के. पाटील, शोभाताई भावसार यांच्यासह डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, प्रवरा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेंद्र वाबळे यांनी तर आभार प्रदर्शन रावसाहेब खेडकर यांनी केले. कारखान्याच्या वतीने संचालक मंडळाने काका कोयटे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ व स्व. वैकुंठभाई मेहता या दोन्ही सहकार दिंड्या राहात्याकडे मार्गस्थ झाल्या.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 9 2 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा