Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

गोकर्णच्या समुद्र किनाऱ्यावर दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्याची सहकारी लाट…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

गोकर्ण येथे संपन्न झालेल्या दीपस्तंभ वितरण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन हातात हात घालून काम करणार असल्याचा संकल्प केला.

गोकर्णच्या समुद्र किनाऱ्यावर दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्याची सहकारी लाट…

गोकर्ण (कर्नाटक) : ज्याप्रमाणे अथांग समुद्रात दीपस्तंभ नौकानयन करणाऱ्यांना दिशा दाखवतो. त्याप्रमाणे दीपस्तंभ पुरस्कार सहकार क्षेत्रातील सहकारी पतसंस्थांना कार्य प्रेरणा, नवी दिशा, दृढ निश्चय, यशस्वी भवितव्य, नव उमेद देत असतो. समुद्रातील वादळामध्ये भरकटलेल्या जहाजांना दीपस्तंभ दिशा दाखवण्याचे काम करतो. त्याप्रमाणे सहकारी पतसंस्था चळवळीतील ज्या सहकारी पतसंस्था दिशादर्शक काम करतात त्यांना गत १० वर्षा पासून सालाबादप्रमाणे या ही वर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित “दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५” तसेच दोन दिवसीय आंतरराज्यीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा व दोन दिवसीय आंतरराज्यीय प्रशिक्षण शिबीर कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वर, कुमठा येथील समुद्र किनारी १२ व १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला.

या दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्या पतसंस्थांना गौरविण्यात आले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन… पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा जास्त प्रगती करून आपण सर्वजण पुन्हा दीपस्तंभ पुरस्कार मिळावा अशा आपणा सर्वांना शुभेच्छा आहे. अतिशय नेत्र दीपक, दिमाखदार, शिस्तबद्ध, अचूक वेळेवर प्रत्येक कार्यक्रम करण्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ला नेहमी प्रमाणे यश मिळालेले आहे. हा पुरस्कार सोहळा दरवर्षी अधिकाधिक भव्य दिव्य दिमाखदार होण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तो यावर्षी देखील यशस्वी झाला हे सांगताना अधिक आनंद होत आहे.

‘दीपस्तंभ पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक चंद्रकांत वंजारी भास्कर बांगर, चिखली चे माजी आमदार व अनुराधा पतसंस्थेचे चेअरमन राहुल बोंद्रे, महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था महासंघ अध्यक्ष चंद्रशेखर सी.एस., बेळगाव प्रांत कर्नाटकचे संयुक्त निबंधक कल्लाप्पा ओबनगोळ, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष दऱ्याप्पा अलगुर, संचालक तमन्ना केंचराहट्टी, उमेश एस.बाली, डॉ.संजय होजमठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुरस्कार प्राप्त पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सहकार झेंडे लावलेल्या बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. त्या बग्गीपुढे कर्नाटकातील दोन तरुणी कथक नृत्य करून त्यांचे स्वागत करीत असताना कर्नाटकातील संस्कृतीचे दर्शन करून देत होत्या.

या पुरस्कार सोहळ्याद्वारे राज्यातील सहकारी पतसंस्थांना सहकार क्षेत्रात कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा आणि ,मनोधैर्य प्राप्त झाले. हा केवळ सन्मानाचा सोहळा नसून तज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाने युक्त एक प्रशिक्षणमंच ठरला. उपस्थित पतसंस्थांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन, त्यांच्या चांगल्या कार्याचे कौतुक, तसेच कार्यातील त्रुटींकडे लक्ष वेधून त्यावर सुधारणा करण्याचे मार्गदर्शन अशा सर्वांगीण उपक्रमांमुळे हे प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरले.

प्रसंगी ‘सहकारी पतसंस्था कर प्रणाली व धोरणे’ या विषयावर सुनील नागावकर, बेळगाव प्रांत व कर्नाटकचे संयुक्त निबंधक कल्लाप्पा ओबनगोळ यांनी ‘सहकार कायदा व कार्यपद्धती’ आणि महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी महाराष्ट्र राज्यातील सहकार कायदा व कार्यपद्धती या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच राज्यातील विविध भागांतून आलेल्या पतसंस्थांच्या प्रतिनिधींमध्ये परस्पर संवाद आणि अनुभवांची देवाण – घेवाण झाली. या चर्चेतून सहकार क्षेत्रात नवी दृष्टी व दिशा मिळण्यास हातभार लागला.

कार्यक्रमाच्या शेवटी दीपस्तंभ पुरस्कार मिळालेल्या सर्व सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधीनी दीपस्तंभ स्मृतीचिन्हात आकर्षक लाइटिंगची मांडणी केली असल्यामुळे सायंकाळच्या सौम्य प्रकाशात, त्या स्मृतीचिन्हांवरील आकर्षक दिव्यप्रकाशने अंधारात काजवा चमकावा असे चमकत होते. जणू अंधारात हजारो छोट्या ताऱ्यांनी जागा भरली असावी. हलक्या सावल्या आणि प्रकाशाचा संगम संपूर्ण परिसरात दिव्यस्पर्शी वातावरण निर्माण करत होता. त्या क्षणी प्रत्येकाचे चेहरे उत्साहाने उजळलेले दिसत होते आणि अंधारात प्रज्वलित दीपस्तंभांचा प्रकाश साक्षात चैतन्याचा अनुभव देत होता.

या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, संचालक चंद्रकांत वंजारी, भास्कर बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, तसेच कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक संजय होजमठ यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व सहभागी व आयोजकांचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

2.6/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे