सहकारी पतसंस्थांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत परिसंवाद संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे मुंबई येथील परिसंवादात मार्गदर्शन करताना.

सहकारी पतसंस्थांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत परिसंवाद संपन्न
मुंबई, २० मे: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने मुंबई येथील वाय. बी. चव्हाण सभागृहात “सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी आणि राज्य बँकेच्या रोख्यांमधील गुंतवणूक” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे प्रमुख उपस्थित होते, तर सहकार आयुक्त दीपक तावरे अध्यक्षस्थानी होते.
नवीन परिसंवादाची घोषणा :
मुंबईतील परिसंवादाच्या धर्तीवरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवीबाबत चर्चा करण्यासाठी आणखी एक परिसंवाद २६ मे २०२५ रोजी होणार आहे. या परिसंवादाला फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे व बँकेचे सल्लागार समिती अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे प्रमुख उपस्थित राहणार असून जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्यासह अन्य अधिकारीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संचालिका ॲड. अंजलीताई पाटील व नारायण वाजे यांनी दिली.
परिसंवादात राज्यातील सहकारी पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. या वेळी व्यासपीठावर सहकार खात्याच्या बँकिंग विभागाचे अधिकारी अनंत कटके आणि सहनिबंधक नितीन काळे यांचीही उपस्थिती होती.
फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी मार्गदर्शन करताना मलकापूर अर्बन को – ऑप. सहकारी बँक व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकलेल्या ठेवी तातडीने परत मिळविण्याची मागणी केली. त्यांनी सहकार खात्याचे कामकाज ऑनलाईन करण्याची गरज मांडली तसेच थकबाकी विषयक प्रकरणांचा निकाल कलम १०१ अंतर्गत त्वरित लावावा, असेही सांगितले. अपसेट प्राईस वेळेत निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची नुकतीच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक रकमेच्या परतव्याची चांगली योजना सुरू केल्याने आगामी सहा महिन्यांत ही बँक आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याची शक्यता आहे.
विद्याधर अनास्कर यांनी यावेळी माहिती दिली की, राज्य सहकारी बँकेने त्यांच्या कर्ज रोख्यांवर साडे आठ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने काढलेल्या कर्ज रोख्यांमध्ये सहकारी पतसंस्थांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ही गुंतवणूक वैधानिक तरलतेच्या निकषांत बसणारी असून त्यावर मिळणारा परतावा आयकरमुक्त असल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.

या परिसंवादात राज्यातील विविध सहकारी पतसंस्थांनी एकूण ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मलकापूर अर्बन बँकेतील ठेवीदारांचे प्रश्न मांडण्यासाठी फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक राजाभाऊ देशमुख, आबासाहेब देशमुख यांनी तर ॲड.अंजलीताई पाटील यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकारी पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवींबाबत प्रभावी भूमिका बजावली.
या कार्यक्रमाला फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक ॲड. डॉ. अंजलीताई पाटील, राजाभाऊ देशमुख, चंद्रकांत वंजारी, भास्कर बांगर, सुरेश पाटील, शरद जाधव आदींसह राज्यभरातील अनेक सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



