Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीत क्रांतिकारक उपक्रमांची नांदी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीत क्रांतिकारक उपक्रमांची नांदी

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ ही ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी महत्त्वाची कडी मानली जाते. लहान बचत, ठेवी व कर्ज यांद्वारे समाजातील सर्वसामान्य घटकांना आधार देणाऱ्या या संस्थांचा विकास काळानुरूप होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी एकत्र येऊन पतसंस्था चळवळीत अनेक क्रांतिकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

२६ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या उपक्रमांवर चर्चा झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक मा. विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, संचालक चंद्रकांतजी वंजारी, निमंत्रित सदस्य सर्जेराव शिंदे, अभिनाथ शिंदे, राज्य फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, बारामती येथील दत्तकृपा पतसंस्थेचे चेअरमन ॲड.दत्ता गावडे, पुणे येथील जय हिंद पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव नेहरकर, श्रमजीवी पतसंस्था चेअरमन विजय वाघमोडे, मुंबई येथील दत्त सेवा पतसंस्थेचे प्रतिनिधी तसेच पतसंस्था चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या चर्चेत पतसंस्थांना राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून चेक क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून देणे, पतसंस्थांच्या ठेवींना गॅरंटी देणे, सोनेतारण कर्जावर रिफायनान्स मिळवून देणे आणि भारतात प्रथमच राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील सहकारी पतसंस्थांसाठी त्रिदल कर्ज व ठेव योजना सुरू करणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. हे उपक्रम केवळ पतसंस्थांच्या मजबुतीसाठीच नाही तर सहकार क्षेत्रात नवीन दिशा देणारे ठरणार आहेत.

या बैठकीत बोलताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले की, भारताचा जीडीपी वाढवायचा असेल, तर राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ बळकट केली पाहिजे. या उद्देशाने आणि सहकारांतर्गत सहकार वाढला पाहिजे या भावनेने महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी बँकेने हे विविध उपक्रम राबविण्याचे हाती घेतलेले आहे. सहकारी पतसंस्थांना रिझर्व्ह बँकेच्या क्लिअरिंग सुविधेचे सभासद होता येत नाही. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सभासदत्व राज्यातील सहकारी पतसंस्थांना देऊन ही योजना आम्ही राबवू शकतो. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र सोनेतारण कर्ज घेण्यावर ग्राहकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पतसंस्थांना सोनेतारण कर्ज वाटपासाठी निधी कमी पडत आहे हे लक्षात घेऊन राज्य सहकारी बँकेकडून राज्यातील सहकारी पतसंस्थांना रिफायनान्स सुविधा राज्य सहकारी बँकेने तयार केली आहे.

सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात असली तरी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त या योजनांना अंतिम स्वरूप देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या या सर्व योजनांमुळे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला उर्जितावस्था येण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मा.काका कोयटे यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रात नवीन आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे, ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत करणे आणि पतसंस्थांना स्थिर आर्थिक आधार मिळवून देणे या उद्दिष्टांमुळे हा उपक्रम सहकारी चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अशा योजना राबविल्यास ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

3.2/5 - (6 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे