श्री हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्थेत नव्या उपक्रमशील नेतृत्वाचा उदय ; तरुणाईच्या सहभागाला चालना
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
श्री हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्थेत नवा उपक्रमशील नेतृत्वाचा उदय ; तरुणाईच्या सहभागाला चालना
अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी व्हा.चेअरमन झालेल्या लाजरी भावसार
धुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण ठरलेली श्री हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्था आता नव्या जोमात प्रगतीकडे वाटचाल करत आहे. १४ ऑगस्ट २००१ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या २४ वर्षांपासून सलग एकाच चेअरमनच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे कामकाज करणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था. संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र मधुकर भावसार (राजू भावसार फेटेवाले) हे सहकार क्षेत्रातील अत्यंत अनुभवी आणि कार्यशील व्यक्तिमत्व मानले जाते.
या पतसंस्थेच्या नेतृत्वात आता नव्या पिढीचा सहभाग वाढू लागला असून, कुमारी लाजरी राजेंद्र भावसार यांची नुकतीच व्हाईस चेअरमन पदावर निवड झाली आहे. एम.बी.ए. (फायनान्स) पदवीधर असलेल्या लाजरी भावसार यांनी डिजिटल मार्केटिंगमध्येही विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. चांगल्या पदावर नोकरी करत असताना वडिलांची सहकार क्षेत्रातील तळमळ पाहून त्यांनी स्वतः प्रशिक्षणासाठी संस्थेत प्रवेश घेतला.
प्रशिक्षणादरम्यान पतसंस्थांच्या समोर असलेल्या सध्याच्या अडचणी – जसे की कर्जदारांकडून होणारी वसुलीतील अडथळे आणि ठेवीदारांची अस्वस्थता – या प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर लाजरी भावसार यांच्यात या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी त्यांनी संपूर्ण व्यवहार ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली. या उपक्रमातून संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली असून काही प्रमाणात संस्था नफ्यात आणण्यात यशही मिळाले.
या यशामागे त्यांना त्यांच्या वडिलांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. वडील श्री राजेंद्र भावसार हे स्वतःचा मोठा व्यवसाय सांभाळूनही आपल्या मुलीला सहकार क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव देत मार्गदर्शन करत आहेत.
या उपक्रमशील बदलाची ठळक नोंद ३० जुलै २०२५ रोजी धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संवाद बैठकीत झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आवाहन केले की, “तरुण पिढीने सहकारी पतसंस्था चळवळीत सक्रियपणे भाग घ्यावा. आम्ही ज्येष्ठ मंडळी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी सदैव तयार आहोत.”
या वेळी लाजरी भावसार यांनी स्वतः उभे राहून आपली ओळख करून देत, वरील माहिती बैठकीत मांडली. त्यांच्या अनुभवाची आणि दृष्टिकोनाची उपस्थितांमध्ये विशेष दखल घेतली गेली. या प्रसंगाने तरुण पिढीच्या सहकार क्षेत्रातील सहभागाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.
व्हाईस चेअरमन लाजरी भावसार यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारांची जागा न राहता, तर लोकांच्या विश्वासाची आणि प्रगतीची ग्वाही बनेल. “तसेच त्या म्हणाल्या, “स्वप्न मोठं आहे, वाट सुद्धा सोपी नाही, पण जिद्द आणि सचोटीच्या बळावर ही पतसंस्था उद्याचं नावाजलेलं आर्थिक केंद्र होईल — हे आम्ही ठरवलं आहे.”
श्री हिंगलाज माता पतसंस्थेचा हा प्रवास नव्या नेतृत्वासह निश्चितच धुळे जिल्ह्याच्या सहकारी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरणार आहे.



