श्री महावीर पतपेढीचा एक शाखेतून विक्रमी प्रवास – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

श्री महावीर पतपेढीचा एक शाखेतून विक्रमी प्रवास – काका कोयटे, अध्यक्ष

शहादा (जि. नंदुरबार), दि. ३० जुलै २०२५ – गत ३५ वर्षांत केवळ एका शाखेच्या माध्यमातून १७२ कोटी रुपयांच्या ठेवी, ८८ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करीत श्री महावीर नागरी सहकारी पतपेढीने सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या यशस्वी वाटचालीची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेला सदिच्छा भेट देत “राज्यातील आदर्श पतसंस्थांपैकी एक” असा गौरव केला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील श्री महावीर नागरी सहकारी पतपेढी भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे बोलत होते.
“फक्त एका शाखेच्या आधारे १७२ कोटी रुपयांच्या ठेवी मिळवणे ही अभूतपूर्व कामगिरी असून, ६.५० ते ७.५० टक्के व्याज दराने ठेवी स्वीकारून ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, तसेच ११ ते १२ टक्के व्याज दराने कर्ज वाटप करणे, हे सहकारी क्षेत्रातील आदर्श मॉडेल ठरते,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ते पुढे म्हणाले, “संस्थेचे चेअरमन रमेशजी जैन यांनी मुलगा समीर जैन यास पुढील संस्थेच्या नेतृत्वासाठी तयार करून श्री महावीर पतपेढी तरुण नेतृत्वाच्या हाती सोपवण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेऊन तरुण नेतृत्वाला तरुण नेतृत्वाला संधी उपलब्ध करून दिली आहे.”
महावीर पतपेढी केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीही जपते आहे. समाजोपयोगी उपक्रमांतर्गत एक ॲम्बुलन्स व एक शववाहीका सेवा, सभासदांच्या अपघातामध्ये १ लाखांची आर्थिक मदत, गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी ५० हजारांची एकरकमी मदत, शहादा बसस्थानकावर वर्षभर पाणपोई व्यवस्था आणि सामाजिक-धार्मिक संस्थांना देणग्यांच्या माध्यमातून समाजसेवा केली जात आहे.
या वेळी पतपेढीचे चेअरमन रमेशजी जैन, संचालक समीर जैन, जनरल मॅनेजर राजेंद्र जैन, मॅनेजर मोतीलाल जैन, असिस्टंट मॅनेजर प्रवीण जैन, वसुली अधिकारी महेंद्र साळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



