राजापूर तालुका कुणबी पतसंस्था महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभिमान – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


राजापूर तालुका कुणबी पतसंस्था महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभिमान – काका कोयटे, अध्यक्ष

राजापूर : “राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी ही शिस्तबद्ध कामकाज, पारदर्शकता आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचा अभिमान ठरली आहे. शून्य टक्के एनपीए, भक्कम गुंतवणूक व आधुनिक डिजिटल सेवा यामुळे ही संस्था इतरांसाठी आदर्श आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर आणि कायद्याचे पालन केल्यास सहकारी पतसंस्था चळवळ अधिक मजबूत होईल,”असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या तळवडे शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा भव्य सोहळा राजापूर तालुक्यातील तळवडे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजापूर कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर होते, तर आमदार भैय्यासाहेब सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच ७०० ते ८०० आसन क्षमतेच्या सभागृहात एकही खुर्ची रिकामी न राहता अनेक ग्राहकांना उभे राहावे लागले. एखाद्या शाखेच्या रौप्य महोत्सवासाठी झालेली ही भरगच्च उपस्थिती पाहून काका कोयटे म्हणाले की, “हा सोहळा म्हणजे पतसंस्थेने ठेवीदारांचा मिळवलेला अपार विश्वास आहे. या विश्वासाच्या बळावर राजापूर तालुका कुणबी पतसंस्था लवकरच १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करेल.” तसेच ठेवीदारांनी राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांपेक्षा भक्कम आर्थिक स्थिती व पारदर्शक व्यवहार असलेल्या सहकारी पतसंस्थांमध्येच आपली गुंतवणूक करावी, असे आवाहन देखील या प्रसंगी त्यांनी केले.

यावेळी बोलताना कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी पतसंस्थेची आर्थिक प्रगती मांडली. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या ठेवी ८४ कोटी रुपये असून त्यापैकी ५४ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संस्थेचा एनपीए शून्य टक्के असून, त्यामुळे ठेवीदारांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच ५६ टक्के वैधानिक तरलता (SLR) राखून पतसंस्थेने आपली आर्थिक स्थिती अधिक भक्कम केली असल्याचा दावाही त्यांनी केला.

या सोहळ्यादरम्यान कुणबी पतसंस्थेच्या मोबाईल बँकिंग, क्यू.आर. कोड बँकिंग तसेच ‘सुधन गोल्ड लोन’ अंतर्गत सुरक्षित सोनेतारण कर्ज योजनेचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. ‘सुधन गोल्ड लोन’च्या माध्यमातून जास्तीत जास्त सोनेतारण कर्ज वाटप करून ठेवीदारांच्या ठेवी अधिक सुरक्षित करण्याचा विश्वास पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर व प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केला.

तळवडे येथील प्रभावती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सुमारे ७०० ते ८०० ठेवीदार व सभासदांची उपस्थिती लाभली. अत्यंत भव्य व दैदीप्यमान स्वरूपात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.



