सहकार क्षेत्रात सांगली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेचा आदर्श म्हणून नावलौकिक – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सहकार क्षेत्रात सांगली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेचा आदर्श म्हणून नावलौकिक – काका कोयटे, अध्यक्ष

सांगली : सांगली टिंबर मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा आणि २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीचा गौरव करत सांगितले की, “सहकार खात्याच्या सर्व निकषांचे पालन करत संस्थेने पतसंस्था चळवळीला बळ दिले असून, सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था ही संपूर्ण राज्यातील पतसंस्थांसाठी एक आदर्श ठरत आहे.”

या २५ वर्षांच्या प्रवासात अनेक संकटांना सामोरे जात संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोन आणि काटकसरी कार्यपद्धतीच्या जोरावर आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. सर्व संचालक व्यापारी वर्गातून येणारे असल्याने निर्णय प्रक्रियेत व्यवहार्यता आणि पारदर्शकता जपली गेली, असेही काका कोयटे यांनी नमूद केले.

संस्थेच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना त्यांनी विशेषतः कार्यालयातील स्वच्छता, नीटनेटकेपणा याचे कौतुक केले आणि सांगितले की, “या संस्थेच्या आर्थिक पत्रकातूनही हीच शिस्त आणि पारदर्शकता प्रतिबिंबित होते.” त्यामुळे ठेवीदारांनी संस्थेवरील विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे सरव्यवस्थापक श्रीकृष्ण मोहिते हे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असून, त्यांचा जिव्हाळा आणि कार्यकुशलता हे संस्थेच्या यशामागचे प्रमुख कारण आहे, असेही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काका कोयटे यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र मुळीक होते. यावेळी सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए.डी. पाटील, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सहयोग सोसायटीचे चेअरमन एम.एस.माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वार्षिक सभेचे अहवाल वाचन संस्थेचे माजी चेअरमन यशवंत माळी यांनी केले. या वेळी संस्थेचे व्हा.चेअरमन किशोर पटेल, संचालक श्रीकांत बानकर, सुरेश इरळे, फरद्दीन शेख, शहेनशहा मकानदार, रमेश खताळ, रमेश मासाळे, सौ. मनीषा निकम, सौ. वैशाली वाघमोडे, प्रकाश निकम आदींसह संस्थेचे असंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण मोहिते यांनी तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सल्लागार धनाजीराव घाडगे यांनी मानले.



