राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून पतसंस्थांना नव संजीवनी देणार विद्याधर अनास्कर ; मावळमधील विचार मंथन शिबिराचा समारोप
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून पतसंस्थांना नव संजीवनी देणार विद्याधर अनास्कर

मावळमधील विचार मंथन शिबिराचा समारोप
पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील स्नेह रिसॉर्ट येथे झालेल्या दोन दिवसीय सहकारी पतसंस्था विचारमंथन शिबिराचा समारोप महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष मा. विद्याधरजी अनास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे सर्वेसर्वा मा. राधेश्यामजी चांडक होते.
समारोप प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे यांनी प्रास्ताविकातून अनास्कर व चांडक यांना सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक म्हणत गौरविले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी मनोगतातून पतसंस्था चळवळ पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

राधेश्यामजी चांडक यांनी बुलढाणा अर्बनच्या यशस्वी प्रवासाचा दाखला देत, “धाडसी निर्णयांना सहकार अधिकाऱ्यांची साथ लाभली तर पतसंस्था चळवळीचा विकास शक्य आहे,” असे प्रतिपादन केले व सहकार खात्याने पुन्हा एकदा सहकारी पतसंस्थांना देखील ठाम साथ द्यावी, असे आवाहन केले.
तसेच विद्याधर अनास्कर यांनी देखील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने अनेक योजना जाहीर करत सोनेतारण कर्ज वाटपाला प्रोत्साहन देऊन खासगी कंपन्यांची मक्तेदारी मोडण्याचे आवाहन केले. सोनेतारण कर्जावर कोटिंग चार्जेसद्वारे रिफायनान्सची सुविधा उपलब्ध करून देणे, पतसंस्थांसाठी विनाशुल्क सायबर सिक्युरिटी सेंटर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच एमएससी बँकेच्या सामूहिक कर्ज योजनेत कन्सोशियम फायनान्स मध्ये सहकारी पतसंस्थांचा सहभाग मान्य करत पतसंस्था विषयक कायद्यातील सुधारणा लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्याचे आश्वासन दिले.
तसेच सहकारी पतसंस्थांना व्यवसाय करायला परवानगी नाही. परंतु विविध कार्यकारी सोसायट्यांना १५० प्रकारचे विविध व्यवसाय करायला परवानगी आहे. त्यांच्याप्रमाणेच सहकारी पतसंस्थांना देखील व्यवसाय करायला परवानगी मिळावी. अशी मागणी या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली असता, उपस्थित सर्व सहकार खात्याचे अधिकारी व मा.विद्याधरजी अनास्कर यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांसोबत भागीदारी करून सहकारी पतसंस्थांना देखील कलम २० नुसार विविध व्यवसाय करता येईल. अशी महत्वपूर्ण माहिती देऊन दिलासा दिला.
युवक व महिलांच्या सहभागासाठी विचार मंथन शिबिरात खास मागण्या पुढे आल्या. युवकांसाठी कायद्यात राखीव जागा ठेवावी तसेच युवक व महिलांसाठी स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी सहकारी पतसंस्था चळवळीतील उपस्थित युवक गटाने केली. तसेच अनिकेत कांचन, अभिषेक पाटील, संदीप भोईटे, नितीन चासकर, पुनम चव्हाण, अमित बेनके यांनी युवकांचा सहकारी पतसंस्था चळवळीतील सहभाग वाढविण्यासाठी पॉडकॉस्ट सुरू करण्याची मागणी केली असता त्यांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘अर्थ संवाद’ या युवकांसाठी खास पॉडकॉस्टची घोषणा केली. या पॉडकॉस्टचे लॉन्चिंग मा. विद्याधर अनास्कर व मा. राधेश्यामजी चांडक यांच्या शुभ हस्ते या वेळी करण्यात आले. या माध्यमातून युवकांचा सहकार चळवळीत सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.



