“सहकार हे फक्त आर्थिक साधन नाही; तर समाज सुधारणा करण्याचे माध्यम आहे” – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


“सहकार हे फक्त आर्थिक साधन नाही; तर समाज सुधारणा करण्याचे माध्यम आहे” – काका कोयटे, अध्यक्ष

शिर्डी, ३० जानेवारी २०२६ : “सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहाराचे साधन नाहीत; तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणणारे माध्यम आहेत. महाराष्ट्र २०४७ या दृष्टीकोनातून उद्योजकता, बचत गट, उद्योग संधी यांचा प्रभावी उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. तरुण कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घेत संस्थांचा विकास सुनिश्चित करणे गरजेचे आहे. सहकार कायद्यात अपेक्षित बदल समजून घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे हा आजच्या काळाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि रेझोनन्स सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य फेडरेशनच्या सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिरात आयोजित एकदिवसीय चर्चासत्र राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील तरुण कार्यकर्ते आणि प्रतिनिधींमध्ये उत्साहवर्धक वातावरणात पार पडले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली उपस्थित कार्यकर्त्यांना सहकारी पतसंस्थांच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. त्या वेळी ते बोलत होते.
“सहकार हे फक्त आर्थिक साधन नाही; तर स्थानिक समाज, बचत गट आणि व्यवसाय विकासाच्या माध्यमातून समाज सुधारणा करण्याचे साधन आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांनी याचा प्रभावी उपयोग करून नव्या संधी निर्माण कराव्यात. तरुणांनी पुढाकार घेऊन सहकारी पतसंस्थांचा विकास सुनिश्चित करणे गरजेचे आहे.” – मिलिंद आरोलकर
काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि नवसंकल्पना राबवण्याचा उत्साह निर्माण झाला. या चर्चासत्राला सहकारी पतसंस्था चळवळीतील तरुण प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला, ज्याने नव्या संकल्पना राबवण्याचा उत्साह वाढविला.

या चर्चासत्राला महाराष्ट्र को – ऑप. बँक फेडरेशन व डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संचालक मिलिंद आरोलकर, राज्य फेडरेशन संचालिका ॲड.अंजलीताई पाटील, संचालक डॉ.रविंद्र भोसले, नारायण वाजे, अहिल्यानगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष शिवाजीआप्पा कपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारच्या सत्रात काका कोयटे यांनी “सहकार कायदा : अपेक्षित बदल” या विषयावर मार्गदर्शन करत स्पष्ट केले की, पतसंस्थांनी कायद्यातील बदलांचा अभ्यास करून आपली कामगिरी अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी त्वरित उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यानंतर रेझोनन्स सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिनारे यांनी “विकसित महाराष्ट्र : उद्योग व व्यवसाय संधी” या विषयावर मार्गदर्शन केले, ज्यात महाराष्ट्रातील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील संधी आणि सहकारी पतसंस्थांसाठी नव उद्योग व सेवा क्षेत्रातील संधी यांचा समावेश होता. त्यानंतर संपदा ट्रस्टचे संचालक व प्रसिद्ध व्याख्याते अनिरुद्ध मिरीकर यांनी “उद्योजकता विकास व बचत गट समूहासाठी उद्योग संधी” या विषयावर मार्गदर्शन करत छोटे उद्योग, स्थानिक व्यवसाय विकास आणि महिला बचत गटांमार्फत उद्योजकतेला चालना देण्याच्या संधी बाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांनी केले. या वेळी राज्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चासत्राचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रेझोनन्स सोल्युशनच्या अरुंधती काटदरे यांनी मानले.



