Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकाराच्या बळकटीकरणासाठी राधेश्याम चांडक व काका कोयटे यांचे योगदान अनुकरणीय – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकाराच्या बळकटीकरणासाठी राधेश्याम चांडक व काका कोयटे यांचे योगदान अनुकरणीय – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


बुलढाणा – महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ सुदृढ व बळकट करून वाढविण्याचे काम मा. राधेश्याम चांडक व काका कोयटे एकत्रितपणे करत आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ बळकट करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राधेश्याम चांडक यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यात काढले.

मा. राधेश्यामजी चांडक यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सहकारी पतसंस्था चळवळीतील ज्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली अशा ज्येष्ठ धुरीनांना राज्य फेडरेशनच्यावतीने “सहकार तपस्वी राधेश्याम चांडक जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने उमदी ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष महादेवप्पन्ना कल्पना होर्ती, मलकापूर येथील महेश नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष मख्खनलाल चिमणलाल मुंदडा, जालना येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष दादाराव तुपकर, ठाणे येथील एकता को-ऑप. क्रेडिट सोसायटी अध्यक्ष सर्जेराव शिंदे उर्फ आबा, चिखली येथील जवाहर नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष रमेश रामलाल बाहेती आणि श्रीरामपूर येथील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्षा सौ. सुशीलाताई नवले यांना गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रसंगी मा. राधेश्यामजी चांडक यांची सहकार ध्वज संचलनानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील ७५ सहकारी पतसंस्थांचे चेअरमन सहकाराचा ध्वज खांद्यावर घेऊन चालत होते. सर्वांच्या पुढे सहकारदेवतेची वेशभूषा धारण केलेल्या स्त्री व्यक्तिमत्त्वाच्या हातात सहकाराचा अमृत कलश होता, त्यामुळे ही शोभायात्रा अतिशय लक्षवेधी व दिमाखदार झाल्याचे उद्गार विखे पाटील यांनी काढले.


सहकारदेवतेने आणलेला सहकाराचा अमृत कलश व्यासपीठावर मा. भाईजींकडे स्वाधीन करण्यात आला. भाईजींनी हा कलश आपले वारसदार बुलढाणा अर्बनचे चेअरमन डॉ. सुकेश झंवर यांच्याकडे सुपूर्द केला. या भावनिक क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.


या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश ददाप्पा तथा काका कोयटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतात पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना सुरू केला. त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील नातू तर आहेच, परंतु ज्यांनी भारतातील सहकार चळवळ वाढवली ते बाळासाहेब विखे यांचे सुपुत्र. राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा वारसा पुढे चालवित आहे. त्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपुत्र सुजय विखे त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्वांचे पालन करत आहेत. त्याप्रमाणेच भाईजी राधेश्याम चांडक यांनीही हीच मूल्ये जपली आहेत. यामुळे या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा सहकार क्षेत्राला प्रचंड अभिमान आहे.


विखे साहेबांनी कधीच आपला साखर कारखाना खाजगी करण्याचा विचार मनात आणला नाही, तसेच भाईजींनी बुलढाणा अर्बनचे स्मॉल फायनान्स व बँकेत रूपांतर होऊ नये अशी भूमिका कायम ठेवली. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व संस्था सहकारी तत्त्वावरच चालतात. शिक्षण संस्था ‘सहकार विद्या मंदिर’ आणि कॅन्टीन ‘सहकार कॅन्टीन’ प्रिंटिंग प्रेस ‘सहकार प्रिंटिंग प्रेस’ या नावाने कार्यरत आहेत. भाईजींनी महाराष्ट्राचा सहकार टिकवला आहे. संकटाच्या काळात राधेश्याम चांडक आणि राधाकृष्ण विखे दोघेही सहकारी पतसंस्थांच्या मदतीसाठी धावून येतात, हे दोघांतील समान वैशिष्ट्य आहे, असे काका कोयटे म्हणाले.


कार्यक्रमास राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, मुख्य समन्वयक डॉ.रविंद्र भोसले, नारायणराव वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून सहकारी पतसंस्था चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भाईजींना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.


अभिष्टचिंतन सोहळा यशस्वीतेसाठी राज्य फेडरेशन तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव, पंडितराव जाधव, मल्टीस्टेट फेडरेशन अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीआप्पा कपाळे, बुलढाणा अर्बनच्या उपाध्यक्षा सौ. स्वातीताई वाकेकर, मंगेश व्यवहारे, बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या उपाध्यक्ष स्वातीताई वाकेकर, संचालिका सौ.स्वातीताई कनेर, संचालक संतोष मापारी, सतीश कायंदे, पंडित दादा देशमुख, दिपक देशमाने, मॅनेजर सूरज शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे